'कलाकार कट्टा' स्थलांतर! भाजप पदाधिकाऱ्यांचे पत्र; निर्णयाचा पुनर्विचार करा, भाजपच्याच नगरसेवकाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:28 IST2026-02-17T13:27:36+5:302026-02-17T13:28:41+5:30
“कलाकार कट्टा हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. स्थानिक नागरिक व कलाकारांचा सल्ला न घेता असा निर्णय घेऊ नये”

'कलाकार कट्टा' स्थलांतर! भाजप पदाधिकाऱ्यांचे पत्र; निर्णयाचा पुनर्विचार करा, भाजपच्याच नगरसेवकाची मागणी
कोथरूड : गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतराच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी हर्षवर्धन दीपक मानकर यांनी केली आहे. ‘कलाकार कट्टा’ हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक असून, त्याच्या स्थलांतरामुळे कलाकारांवर व कला रसिकांवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक मानकर यांनी गुडलक चौक येथे प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थिती, वाहतुकीचे नियोजन व जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी कलाकारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व स्थलांतरास विरोध दर्शवत कलाकारांना पाठिंबा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला कलाकार कट्टा हा कवी, लेखक, चित्रकार, संगीतकार, नाट्यकर्मी, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मुक्त संवादाचे व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. हा कट्टा केवळ एक जागा नसून पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असल्याचे मानकर यांनी नमूद केले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकांच्या संकल्पनेतून हा कट्टा साकारण्यात आला होता. मात्र, परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण देत भाजपच्याच काही नगरसेवकांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे कलाकार कट्टा स्थलांतराबाबत लेखी पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर मानकर यांनी स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी, कलाकारांवरील परिणाम तसेच स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला. “कलाकार कट्टा हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. स्थानिक नागरिक व कलाकारांचा सल्ला न घेता असा निर्णय घेऊ नये,” असे ते म्हणाले. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना पत्रव्यवहार करून स्थलांतर निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणार असल्याचेही मानकर यांनी सांगितले.