जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:08 IST2025-03-05T12:07:37+5:302025-03-05T12:08:12+5:30
विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली

जुन्नर अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला? सोनावणेंच्या पक्षप्रवेशाने उलटसुलट चर्चांना उधाण
नारायणगाव : अपक्ष निवडून आलेले व नुकतेच शिंदेसेनेत प्रवेश केलेले जुन्नरचेआमदार शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथील भर सभेत एकनाथ शिंदे यांना आय लव यू म्हटल्याची चर्चा सध्या पुणे जिल्ह्यात सुरू आहे. या प्रेमाच्या कबुलीमध्ये विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा आमदार सोनवणे यांना पाठिंबा होता हे या सभेत सिद्ध झाल्याने युतीचा अधिकृत उमेदवार पडला की पाडला या चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २८ फेब्रुवारी रोजी नारायणगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेत ४०० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी शरद सोनवणे यांना तब्बल पाच तास देऊन जुन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन तालुक्याचा आढावा घेतला. महासभेत पक्षप्रवेशानंतर अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी केलेल्या भाषणात शिंदे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. शिंदे यांनीही आपल्या भाषणात सोनवणे हे युतीचे २३३ वे आमदार असा उल्लेख करून जुन्नर तालुक्याचा मागील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासन देऊन सोनवणे यांनी सुचवलेली सर्व विकासकामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले. गेली ३० ते ४० वर्षे रखडलेला दाराघाटही फोडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सोनवणे यांनी आपल्या भाषणात शेवटी एकनाथ शिंदे यांच्यावर असलेले आपले प्रेम व्यक्त करीत आय लव यू म्हणून एकनाथ भाई यांना प्रेमाची कबुली दिली. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी एकनिष्ठ राहून शरद सोनवणे हे त्यांच्यासोबत गेले. विधानसभा निवडणुकीत सत्तेत युती असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला जुन्नरची जागा मिळणार हे निश्चित असल्याने सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. शिंदे गटात बंडखोरी केली तरी सोनवणे यांना एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असल्याची चर्चा होती. त्यास नारायणगाव येथील सभेत सोनवणे यांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा होता हे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीसाठी सोनवणे यांना वैयक्तिक मदत केल्याची चर्चा होती. त्याचा पुरावा म्हणजे मतमोजणीच्या दिवशी निवडून आल्यानंतर शिंदे यांनी थेट हेलिकॉप्टर पाठवून सोनवणे यांना बोलावून घेतले होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. निवडणुकीत पक्षाकडून हकालपट्टी करण्याचा फार्स होता हेही स्पष्ट झाले आहे.
....म्हणूनच केली मदत
वास्तविक शरद सोनवणे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाणे मतदारसंघातील महत्त्वपूर्ण दोन तालुक्यांची जबाबदारी शरद सोनवणे यांना देण्यात आली होती आणि ती त्यांनी चांगल्यारित्या निभावली होती. तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांचा शरद सोनवणे यांच्यावर विश्वास वाढला होता. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी सोनवणे यांना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि विधानसभा निवडणुकीत शरद सोनावणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांना तिसऱ्या स्थानावर जावे लागले. बेनके यांच्या विरोधात बंडखोरी झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार पडला की पाडला याविषयी चर्चेला उधाण आले आहे.