खळबळजनक! मैत्रिणीच्या घरातच दागिन्यांची चोरी; बहिणीने गळ्यात घालून स्टेटस ठेवले अन् चोरी उघड झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:07 IST2025-07-11T11:07:10+5:302025-07-11T11:07:42+5:30
मैत्रिणीने सोन्याचे दागिने एका कपाटात ठेवताना पहिले होते, त्यानंतर थेट तिच्या बहिणीच्या गळ्यात दिसून आले

खळबळजनक! मैत्रिणीच्या घरातच दागिन्यांची चोरी; बहिणीने गळ्यात घालून स्टेटस ठेवले अन् चोरी उघड झाली
राजगुरूनगर: मैत्रिणीच्या घरातच अडीच लाखाचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करुन काही महिन्यांनी ते दागिने गळ्यात घातले. फोटो काढून बहिणीने व्हाट्सअप वर स्टेटस ठेवल्यामुळे चोरीच्या छडा लागला आहे. खेडपोलिसांनी स्टेटसच्या पुराव्यावरून एका महिलेला अटक केली. शितल अमोल वायदंडे (वय ३३ रा. पडाळवाडी राजगुरूनगर ,मुळगाव, वडगाव हवेली, भिमकुंड सातारा ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, खेडपोलिसांनी तिला अटक केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पुनम सत्यावान आदक (वय ३६ रा. आर्या रेसीडन्सी, पडाळवाडी रोड, थिगळस्थळ, राजगुरूनगर, ता. खेड ) येथे राहण्यास आहे. २०२१ मध्ये फिर्यादीच्या घराच्या वरच्या मजल्यावर आरोपी शितल अमोल वायदंडे ही भाड्याने राहत होती. फिर्यादी महिलेची चांगली ओळख झाली होती. ती अधुन मधुन घरी येत जात होती. दरम्यान शितल वायदंडे हीने सोन्याचे दागिने त्यामध्ये मंगळसुत्र, नेकलेस, कानतले जोड, टॉप्स, चैन, अंगठ्या व सासूचे मणी, कानातले फुले कानातले वेल, बदाम असे दागिणे घरातील कपाटातील कप्प्यामध्ये एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवताना पाहिले होते. त्यानंतर एक वर्षांनी शितल वायदंडे व तिचे पती शेजारी बिल्डिंग मध्ये राहण्यास गेले. शितल वायदंडे हि फिर्यादीची मैत्रीण असल्यामुळे घरी ये जा सुरू होती .(दि. २८/८/२०२४ ) मध्ये फिर्यादी महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने लग्नास जाण्यासाठी कपाटातील दागिने मिळून आले नाही. घरातील सर्वांना दागिने बाबत विचारपूस केली. परंतु दागिन्याबाबत काहीही माहिती मिळून आली नाही. मैत्रीण शितल वायदंडे हिच्याकडे दागिन्याबाबत विचारपुस केली असता मी तुझे दागिने घेतले नाहीत तु माझ्यावर खोटा आरोप करू नको, असे म्हणाली. त्यानंतर फिर्यादीच्या घरात नातेवाईक व मैत्रिण येत जात असल्याने त्यांना त्रास होवू नये म्हणुन पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. त्यानंतर फिर्यादीची मैत्रीण शितल वायदंडे हिच्या बहिणीचे मे २०२५ मध्ये व्हॉटसअप स्टेटस पहिले असता शितल वायदंडे व तिच्या बहिणीच्या गळ्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिने दिसून आले. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.