Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:28 IST2025-10-25T19:28:06+5:302025-10-25T19:28:54+5:30
मोहोळ यांना घेराव घातल्यावर त्यांनी सांगितले की, मी गुरुजींनी शब्द दिला असून जैन बांधवांना न्याय मिळवून देणार आहे

Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली
पुणे: मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असल्याचा आरोप करत या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध केला आहे. या प्रकरणात जैन बोर्डिंग जागेबाबत रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मोहोळ यांच्या बिल्डर मित्राने हा व्यवहार केल्याचे पुरावे त्यांनी दाखवले. तसेच त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोपही केले. या सगळ्या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी जैन बांधवांशी संवाद साधला. जैन बांधवांना न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मोहोळ यांनी जैन बांधवांना दिले.
त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोहोळ यांच्याविरोधात जैन समाजाने घोषणाबाजी केली. मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन मुनींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल असं म्हटलं. मी गुरुजींनी शब्द दिला आहे. १ तारखेपर्यंत जागेबाबत सर्व काही व्यवस्थित होईल. जैन बांधवांना न्याय मिळवून देणार आहे. दरम्यान, मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोहोळ यांच्यासमोरच जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोहोळ यांना काढता पाय घ्यावा लागला.
दरम्यान जैन बांधवांसोबत बैठक झाल्यानंतर मोहोळ म्हणाले, गुरुदेवजी यांनी याठिकाणी सांगितलं की, लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे. हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावनाही लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन मी या विषयात आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा राहीन.