Pune Police: आयटी तरुण -तरुणीला धमकावत पैसे उकळले! पुण्यातील 3 खंडणीखोर पोलीस निलंबित
By किरण शिंदे | Updated: April 9, 2026 09:52 IST2026-04-09T09:52:25+5:302026-04-09T09:52:48+5:30
Pune Police रक्कम फोन-पेच्या माध्यमातून घेतली गेली असून पैसे ‘ओंकार ऑटो गॅरेज’ नावाच्या स्कॅनरवर ट्रान्सफर करण्यात आले

Pune Police: आयटी तरुण -तरुणीला धमकावत पैसे उकळले! पुण्यातील 3 खंडणीखोर पोलीस निलंबित
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणीला मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणून धमकावत पैसे उकळल्याप्रकरणी तीन पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी या तरुणावर कारवाई करण्याऐवजी धमकी देत खंडणी मागितली. सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो, तुमची नोकरी घालवतो, नातेवाईकांना बोलावतो अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या.याच दरम्यान, खाडे याने तरुणाला चापट मारल्याचेही समोर आले आहे. तर कांबळे याने तरुणीला पोलिस ठाण्यात ताटकळत उभे ठेवले.
हा प्रकार मिटवण्यासाठी तिघा पोलिसांनी तरुणाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे, ही रक्कम फोन-पेच्या माध्यमातून घेतली गेली. हे पैसे ‘ओंकार ऑटो गॅरेज’ नावाच्या स्कॅनरवर ट्रान्सफर करण्यात आले. पोलिसांच्या वर्तनामुळे दुखावलेल्या या आयटी अभियंता असलेल्या या तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत तिघा पोलिसांचा गैरप्रकार उघड झाला. यानंतर पोलिस आयुक्तांनी तिघांनाही निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.