'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:52 PM2021-03-11T20:52:33+5:302021-03-11T20:52:57+5:30

का होतोय इतका परीक्षार्थी उमेदवारांचा संताप?

It is not easy to do MPSC, brother; Say the struggle behind it | 'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!

'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!

Next

प्राची कुलकर्णी - 
परीक्षा रद्द झाल्याच्या रागात एमपीएससी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन करत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. पण हा आक्रोश नेमका कशासाठी? काय आहे या विद्यार्थ्यांची अडचण, कसे आहे या मुलांचे आयुष्य हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. 

पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो अभ्यासिका उभ्या राहिल्या. पेठेतल्या या अभ्यासिका म्हणजे एक खोली आणि त्यात ओळीने मांडलेल्या टेबल खुर्च्या. काही अभ्यासिकांमध्ये अगदी वायफाय पासून ते लायब्ररी पर्यंतची सोय.पण सोयी सुविधांमध्ये फरक झाला तरी प्रत्येक अभ्यासिकेतले विद्यार्थ्याचे विश्व असते ते ही टेबल खुर्चीच.. दिवसातले जवळपास १० ते ११ तास विद्यार्थी या खुर्चीवर बसुन असतात. पुढ्यातली पुस्तके वाचत किंवा कानात हेडफोन घालुन लेक्चर ऐकत आणि यासाठी हे विद्यार्थी मोजतात महिन्याकाठी ७०० ते ८०० रुपये. पण मुलांसाठी हा खर्च म्हणजे त्यांच्या अनेक खर्चांपैकी एक. आणि खरंतर त्यांच्या इतर खर्चात सगळ्यात कमी. 

दिवसभर याच अभ्यासिकेतल्या स्वत:च्या खुर्चीवर अभ्यास आणि रात्री नोकरी हे गेले २ वर्ष २३ वर्षांच्या आशिष पवारचे रुटीन झाले आहे. मूळ यवतमाळचा असणाऱ्या आशिषचे पालक मोलमजुरी करतात. त्यातून स्वत:चा खर्च भागवतानाच नाकीनऊ येतात.. त्यामुळे पुण्यात राहायला आलेल्या आशिषला स्वत:चा खर्च अर्थातच स्वत: भागवावा लागतोय. सकाळी उठल्यापासून अभ्यास, मध्ये फक्त घेतला तर जेवणाचा ब्रेक आणि रात्री वॅाचमनची नोकरी करत तो महिन्याकाठी येणारा ८ ते १० हजारांचा खर्च भागवतोय. पुस्तक खरेदी आणि इतर काही खर्च आला की हे गणित आणखीच बिघडते. 'लोकमत'शी बोलताना आशिष म्हणाला “एका खोलीत १० ते १२ जण राहतो. दिवसभर अभ्यास आणि रात्री नोकरी करतो.पण दोन वर्ष झाली परीक्षा नाही झाली. काय करावे ते कळत नाही. घरच्यांना माहितीय की, मुलगा परीक्षा द्यायला गेला. पण इतकं सगळं करुन पुण्यात राहुन मुलाला परीक्षा देताच आली नाही हे त्यांना कुठे माहीत?” 

आशिषसारखीच अवस्था नांदेडच्या २३ वर्षांच्या सम्यक कोकरेची. त्याच्या घरचेही मोलमजुरी करत त्याच्या शिक्षणाला पाठिंबा देत आहेत. पुण्यात गेलेला मुलगा म्हणजे त्याचे आयुष्य सुधारेल, परीक्षा झाली की त्याला सरकारी नोकरी लागेल ही पालकांची अपेक्षा. पण प्रत्यक्षात मात्र “सकाळी आई- वडील रोजंदारीला जातात. त्या कमाईतून त्यांची संध्याकाळच्या जेवणाची सोय होते. त्यातून जे पैसे उठतात ते माझ्यासाठी पाठवतात. एक वर्ष त्यांनी मदत केली मग कोरोना आला. आता परीक्षाच नाही” 

अशीच अवस्था कमी अधिक फरकाने सगळ्याच विद्यार्थ्यांची. मग एमपीएससी तयारी करतात तरी का हे विचारल्यावर कोल्हापूरचा एक विद्यार्थी म्हणाला “ घरची शेती आहे. त्याची अवस्था बघितल्यावर शिक्षण घेतले.शिक्षण घेतल्यावर त्याचा उपयोग काय म्हणून नोकरी शोधायला लागलो.पण नोकरी मिळेचना..यातूनच एमपीएससीकडे वळलो. 

या मुलांसारखेच हजारो विद्यार्थी आहेत. कोणी २१ वर्षी तयारी सुरु केलीये तर कोणी २३व्या.. पण दोन चार वर्ष अभ्यास करुन केवळ परिक्षा होईना म्हणून संधी हातची जातेय का काय अशी भीती त्यांना वाटतेंय. आणि याचाच उद्रेक होत आज ते रस्त्यावर उतरले आहेत.

Web Title: It is not easy to do MPSC, brother; Say the struggle behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.