लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:16 IST2025-10-18T19:16:07+5:302025-10-18T19:16:54+5:30
‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे - प्रेम बिऱ्हाडे

लंडनमध्ये नाेकरी मिळवण्यात ‘जाती’चा अडथळा? तरुणाच्या आराेपानंतर राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?
पुणे: मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील प्रेम बिऱ्हाडे हा तरुण पुण्यातील माॅडर्न महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करून लंडनला पाेहाेचला. तेथे ससेक्स विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी त्याची निवडही झाली, पण पूर्वीच्या पुण्यातील माॅडर्न महाविद्यालयाने प्रमाणपत्र पडताळणीस टाळाटाळ केली आणि त्याला ही संधी गमवावी लागली. हे सर्व या तरुणानेच पुढे येत जाहीरपणे मांडले आणि राज्यात खळबळ उडाली. ‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे, असे या विद्यार्थ्याने स्पष्ट केले, पण महाविद्यालयाने या आराेपाचे खंडन केले आहे. प्रेम बिऱ्हाडे याच्या मते, आवश्यक कागदपत्रे सादर करूनही पुणे येथील ‘मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स’ने त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याला नाेकरी गमवावी लागली. याची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हँडलवर ट्विट करत जातीय भेदभावाचा हा प्रकार असल्याचे मांडले.
नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेम याला नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी महाविद्यालयाने 'जात' विचारली हाेती. जातीय भेदभाव करून जाणीवपूर्वक व्हेरिफिकेशन केले नाही, असा आराेप केला. कॉलेजने मात्र सर्व आरोप फेटाळत विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये २०२०-२४ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण करून उच्चशिक्षणासाठी प्रेम ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेस प्रवेश मिळवला हाेता. यासाठी कॉलेजने दोन पत्रे देखील दिली आहे. पण, नाेकरीसाठी प्रयत्न करत असताना ब्रिटनमधील एका कंपनीने ई-मेलद्वारे प्रेमच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत माॅडर्न कॉलेजला विचारणा केली. मात्र, कॉलेजने त्यास टाळाटाळ केल्याने, प्रेमने विभागप्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्य यांच्याशी संपर्क साधून पडताळणी करून, प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. पण, मी कॉलेजमध्ये अनुपस्थित राहायचाे आणि केवळ परीक्षेला उपस्थित राहायचो. त्यामुळे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रेमने केला आहे. त्यानंतर देशपातळीवर याची चर्चा झाली. याबाबत प्राचार्य डाॅ. निवेदिता एकबाेटे यांच्याशी संपर्क केला असता उत्तर दिला नाही.
विश्वस्तांवर कारवाई करण्याची मागणी
प्रेम बिऱ्हाडे याला न्याय मिळावा, मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गजानन एकबोटे, प्रा. अंजली सरदेसाई, प्रा. लॉली दास यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करावी, शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या करत ‘वंचित’चे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांनी निवेदन दिले. याचबराेबर माॅडर्नचे विभागप्रमुख लॉली दास आणि उपप्राचार्य डॉ. अंजली सरदेसाई यांना निलंबित करण्याची मागणी आरपीआय (सचिन खरात) गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी केली आहे. युवासेना राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनीही कुलपती, कुलगुरू यांच्याकडे अर्जाद्वारे दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माॅडर्न येथील प्रकरणाची सखोल चौकशी करावी; अन्यथा युवा सेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला आहे.
काॅलेजचा संबंध तीन वर्षाचा!
शिवाजीनगर ‘मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स’ येथील बीबीए विभागातून प्रेम बिऱ्हाडे याने २०२१ ते २३ याकाळात पदवी शिक्षण पूर्ण केले. नेमका ताे काळ काेराेनाचा हाेता. त्यामुळे वर्ग ऑनलाइन झाले हाेते. पुढे ताे शिक्षणासाठी बाहेर देशात गेला. तेव्हा काॅलेजकडून आवश्यक सर्व कागदपत्र पुरविले गेले. थर्डपार्टी संस्थेकडून महाविद्यालयाला मेल आला आणि पाच वर्षाचे व्हेरिफिकेशन करून देण्यास सांगितले. कालमर्यादा दिलेली नव्हती. पण, विद्यार्थ्याने नाहक चुकीची माहिती पसरवली आहे, असे संस्थेचे कार्यवाह श्यामकांत देशमुख यांनी दिली.