भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील जलजीवनच्या कामात अनियमितता, अर्धवट कामे; चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:31 IST2025-12-16T09:31:16+5:302025-12-16T09:31:42+5:30
जलजीवन मिशनच्या मोठ्या प्रमाणात अनियमितता, अर्धवट कामे आणि कामे पूर्ण होण्याआधीच ठेकेदारांची बिले अदा करण्याचे प्रकार घडले आहेत.

भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील जलजीवनच्या कामात अनियमितता, अर्धवट कामे; चौकशी होणार
कोळवण/राजगड : भोर, राजगड आणि मुळशी या तालुक्यात जलजीवन मिशनच्या मोठ्या प्रमाणात अनियमितता, अर्धवट कामे आणि कामे पूर्ण होण्याआधीच ठेकेदारांची बिले अदा करण्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्रीगुलाबराव पाटील यांची भेट घेत दोषी असणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. याची गंभीर दखल घेत मंत्री पाटील यांनी या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवांना दिले आहेत.
भोर, राजगड - मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच यासंदर्भात नुकतीच राज्याचे पाणीपुरवठामंत्रीगुलाबराव पाटील यांची भेट घेत त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. यामध्ये जलजीवन मिशनमधील सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. याची तातडीने दखल घेत पाणीपुरवठामंत्री पाटील यांनी या तीनही तालुक्यातील जलजीवनच्या कामांची चौकशीचे आदेश दिले आहेत.
यावेळी आमदार मांडेकर यांनी सांगितले की, नागरिकांना पाणी मिळणे हा मूलभूत हक्क असून, या योजनांतील त्रुटी तातडीने दूर होणे आवश्यक आहे, यासाठी पाणीपुरवठामंत्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी जलजीवनमधील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबधित यंत्रणांना देण्यात यावेत. निकृष्ट कामे आणि अनियमित कामांवर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. जादा देयके दिली असल्यास ती तात्काळ वसूल करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच कामे पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची दक्षता व गुण नियंत्रण मंडळामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
जलजीवनच्या अपूर्ण कामासंदर्भात सातत्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला. याविषयी जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या गावनिहाय पाणीपुरवठा योजनांचा आढावा गटविकास अधिकारी, संबंधित पाणीपुरवठा अधिकारी, संबंधित गावचे सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामसेवक, ठेकेदार यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले.