जुबेरच्या मोबाइल, लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाइलची तपासणी सुरू, एक टीबीपेक्षा जास्त डेटाचे विश्लेषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:44 IST2025-11-15T15:43:03+5:302025-11-15T15:44:12+5:30
जुबेरच्या मोबाइल व लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातून सबळ पुरावा मिळाल्यानंतर आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी केली जाणार आहे.

जुबेरच्या मोबाइल, लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाइलची तपासणी सुरू, एक टीबीपेक्षा जास्त डेटाचे विश्लेषण
पुणे : ‘अल कायदा’ या जागतिक दहशतवादी संघटनेचा कथित समर्थक असलेल्या जुबेर हंगरगेकर याच्या मोबाइल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाइलची तपासणी सुरू आहे. ही माहिती एक 'टीबी'पेक्षा (टेरा बाइट्स) अधिक असून, त्याच्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. त्यासाठी जुबेरच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि. १४) दिले.
‘अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट’(एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर (वय ३७, रा. कोंढवा) याला एटीएसने २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याला पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी दुपारी विशेष न्यायाधीश के. एन. शिंदे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी आरोपीविरोधात पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असल्याने त्याच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी एटीएसचे सहायक आयुक्त अनिल शेवाळे आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
या मुद्द्यांवर 'एटीएस'चा तपास सुरू
- जुबेरच्या मोबाइल व लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातून सबळ पुरावा मिळाल्यानंतर आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी केली जाणार आहे.
- आरोपीच्या संपर्कातील संशयित व्यक्तींबाबतचे पुरावे मिळाल्यास त्याचीही आरोपी समवेत पडताळणी केली जाणार आहे.
- आरोपीच्या बँक खात्याचे 'फॉरेन्सिक' लेखापरीक्षण सुरू असून, त्याच्या खात्यात पगाराव्यतिरिक्त किती रक्कम प्राप्त झाली, ती कोणाला पाठविण्यात आली, याचा तपास सुरू.
- आरोपीच्या जुन्या व नव्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान येथील रहिवाशांचे क्रमांक 'सेव्ह'. त्याबाबत आरोपी माहिती देत नसल्याने कॉल रेकॉर्डचे विश्लेषण सुरू.
- तपासात निष्पन्न होणाऱ्या आरोपींची जुबेरसमवेत एकत्रित चौकशी केली जाणार.