शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

International Women's Day Special: 'सुंद्री'चे सूर जिवंत ठेवण्याचा एकच ध्यास अन् वाद्यात महिलाही पुढे याव्यात हीच जिद्द

By नम्रता फडणीस | Updated: March 8, 2026 13:49 IST

त्यांच्याशी 'जागतिक महिला दिनानिमित्त’ साधलेल्या संवादात 'सुंद्री’चे सूर जिवंत ठेवण्याचा एकच ध्यास आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पुणे - सनई, शहनाईसारख्या सुषिर वाद्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख असलेले 'सुंद्री' हे वाद्य आज फारसे परिचित नाही. परंतु, या दुर्मीळ वाद्याला जपण्याचे काम एक महिला कलाकार मनापासून करीत आहे. कुटुंबातील संगीताचा वारसा, बालपणापासून कानावर पडलेले सूर आणि या वाद्यात महिलाही पुढे याव्यात ही जिद्द, या सगळ्यांतून सुंद्री वादनाची वाट निवडलेल्या जगातील पहिल्या महिला सुंद्रीवादक नम्रता गायकवाड केवळ वादन करत नाहीत, तर या वाद्याचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्नही करीत आहेत. त्यांच्याशी 'जागतिक महिला दिनानिमित्त’ साधलेल्या संवादात 'सुंद्री’चे सूर जिवंत ठेवण्याचा एकच ध्यास आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कुटुंबात सनई/सुंद्री वादनाचा वारसा आहे, म्हणून सुंद्री वादनाकडे वळलात का?

- कुटुंबाकडून वारसा मिळाला म्हणूनच सुंद्री वादनाकडे वळले असे नाही. आईच्या गर्भात असल्यापासून सनई-सुंद्रीचे सूर माझ्या कानी पडत होते. कुटुंबातील सर्वांना वादन करताना पाहत मोठी झाले. खेळतानाही मुलांच्या हातात सुंद्री दिली जायची. त्यामुळे या वाद्यावर मनापासून प्रेम जडले. ‘या वाद्यात एखादी स्त्री का नाही?’ हा प्रश्न कायम मनात असायचा. त्यातूनच सुंद्री वादनाचा ध्यास घेतला.

शहनाई, सनई आणि सुंद्री ही तीन वाद्ये दिसायला सारखी असली तरी त्यांचे वेगळेपण काय?

- सनई हे महाराष्ट्रीयन वाद्य आहे. माझे पणजोबा सनई वाजवीत असत. सनईची निर्मिती वेगळी आहे. शहनाईला बनारसी बाज असतो. बनारसी शहनाई नरकटापासून बनवलेल्या पत्तूरने वाजवली जाते, तर मराठी सनईला ताडाच्या पानापासून बनवलेले पत्तूर असते. लाकडी नळीवर सहा किंवा नऊ छिद्रे असतात. त्या छिद्रांवर बोट ठेवून वेगवेगळे स्वर निर्माण होतात. सुंद्री हे दुहेरी रीड असलेले सुषिर लोकवाद्य असून, ते शहनाईची धाकटी बहीण मानले जाते. साधारण ८ ते १० इंच लांबीचे हे वाद्य शिसम लाकडापासून बनवलेले असते आणि त्यात ७ ते ९ छिद्रे असतात. ‘संगीत रत्नाकर’मधील ‘मधुकरी’ या वाद्याशी त्याचे साधर्म्य मानले जाते. सुमारे शंभर वर्षांपूर्वी अक्कलकोटचे राजे फत्तेसिंह भोसले यांनी या वाद्याला राजाश्रय दिला होता.

आज सतार, वीणा, बासरी, व्हायोलिन, गिटारसारख्या वाद्यांकडे तरुणी आकर्षित होत आहेत; पण सुंद्री वादनात महिलांची संख्या कमी का आहे?

- सुंद्री वाद्य म्हणावे तेवढे प्रसिद्ध नाही. त्यामुळे वादकांची संख्या कमी आहे आणि महिला वादक तर शोधूनही सापडत नाहीत. काही जण सुंद्री वादनामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, असेही म्हणतात; कदाचित त्यामुळेही काही जणी मागे राहतात. परंतु, मुख्य कारण म्हणजे या वाद्याचा पुरेसा प्रचार-प्रसार झालेला नाही. अनेकांना ‘सुंद्री म्हणजे काय?’ हेही माहिती नसते. त्यामुळे शालेय स्तरावर या वाद्याबद्दल माहिती दिली पाहिजे, तसेच शिष्यवृत्ती देण्याचीही गरज आहे.

 तुमच्या कुटुंबाने सुंद्री वाद्य जिवंत ठेवले आहे; पण शासनस्तरावर काय होणे अपेक्षित आहे?

- ऑल इंडिया रेडिओमध्ये शहनाई कलाकारांसाठी ग्रेडनुसार संधी होत्या; मात्र सुंद्रीसाठी तशी व्यवस्था कधीच झाली नाही. सुंद्री वादकांना फारशा संधी मिळाल्या नाहीत. कलाकारांना योग्य मानधन मिळाले नाही तर ते हे वाद्य का वाजवतील? सरकारने सांस्कृतिक उपक्रम राबवून सुंद्री वादकांना प्रोत्साहन द्यावे. महाराष्ट्राबाहेरील महोत्सवांमध्ये त्यांना संधी द्यावी. सुंद्रीवर संशोधनही झालेले नाही. त्यामुळे हे वाद्य लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. आम्ही ‘शहनाई-सुंद्री गुरुकुल अकादमी’ सुरू करून गुरुकुल पद्धतीने प्रशिक्षण देत आहोत.

महोत्सवात तुमचे वादन ऐकून तरुणी सुंद्री वादनाकडे वळताना दिसतात का?

- हो, नक्कीच. सुंद्रीचे सूर प्रत्यक्ष ऐकताना लोकांना खूप आनंद होतो. मात्र, त्यामागचा कलाकारांचा संघर्ष फारसा दिसत नाही. शास्त्रीय संगीत शिकणे अवघड असते; पण कठीण गोष्ट शिकताना मिळणारा आनंदही तितकाच मोठा असतो. तो अनुभवण्यासाठी संयम आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.

जगातील पहिली महिला सुंद्रीवादक म्हणून तुम्हाला जबाबदारी वाटते का?

-निश्चितच. सुंद्री वादनात अधिकाधिक कलाकार यावेत, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या वाद्यावर संशोधन व्हावे आणि हे वाद्य जिवंत राहावे, ही माझी इच्छा आहे. पुढील पिढी तयार व्हावी म्हणून मी माझ्या मुलीलाही प्रशिक्षण देत आहे. या क्षेत्रात मुलींची संख्या वाढावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. 

 

अनेकदा काही लोक असे विधान करतात की सुंद्री हे वाद्य केवळ आमच्या घराण्यातच वाजवले जाते; परंतु हे सत्य नाही, जे लोक सनई वाजवत होते. त्यांच्या घराण्यात सुंद्री हे वाद्यदेखील वाजविले जायचे. कारण, ते सनईसदृश्य असल्याने व सनई ताडाच्या पानापासून बनविलेल्या जिबाळाने वाजवली जात असल्याने सुंद्रीदेखील ताडाच्या पानापासून बनविलेल्या जिबाळानेच वाजविली जात होती. यामध्ये आता मी व आमच्या घराण्यात सनईला जे पत्तूर वापरले जाते जे नरकट यापासून बनविले जाते, तेच वापरून सुंद्रीचा नाद अधिक सौंदर्यपूर्ण व गायनातील विविध अंगे वाजवीत नवनवीन प्रयोग यशस्वी करत आहोत.

English
हिंदी सारांश
Web Title : International Women's Day: Preserving 'Sundari' music, empowering women in instruments.

Web Summary : Namrata Gaikwad, the first female Sundari player, passionately preserves the rare instrument. She aims to promote it among women, continuing her family's musical legacy through training and performance, ensuring its survival.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWomenमहिला