पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती येणार एका क्लिकवर; ॲप तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:14 IST2025-07-09T17:12:16+5:302025-07-09T17:14:02+5:30
पुणे जिल्हा निसर्गसंपन्न असून गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे असे पर्यटनाची अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती येणार एका क्लिकवर; ॲप तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
पुणे: प्रचंड निसर्ग संपदा, राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचा उगम, घाट परिसर, संपन्न शेती, शिक्षणाचे माहेरघर, ऐतिहासिक वारसा, वैभवशाली परंपरा, सण उत्सवांची रेलचेल अशई ओळख असलेल्या पुणे जिल्ह्याचे पर्यटन आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पुणेकर असो किंवा परदेशी शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची इत्थंभूत माहिती तेथे जाण्यासाठीच्या मार्गाबरोबरच वाहन व्यवस्था, भेट देण्याची वेळ आणि काळ, प्रवेश शुल्क हे सर्व एका ॲपवर मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला आहे. पुढील वर्षभरात ही व्यवस्था प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पुलावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने तो पडला आणि चार पर्यटकांना जीव गमवावा लागला. यापूर्वीही अशा अनेक घटना जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांवर घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळांवर सोई-सुविधा वाढविण्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये पर्यटकांच्या सोईसाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सर्व स्थळांची माहिती एकत्रित दिली जाणार आहे.
पुणे जिल्हा निसर्गसंपन्न आहे. गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे असे पर्यटनाची अनेक ठिकाणे जिल्ह्यात आहेत. तसेच या पर्यटनस्थळांना जोडणारे रस्तेदेखील आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटकांबरोबरच परराज्य आणि परदेशातून पर्यटनासाठी येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. मात्र, ही ठिकाणे कुठे आहेत, तेथे जाण्यासाठी वाहनाची सुविधा, त्या ठिकाणी निवास आणि खाण्यापिण्याची सुविधा याची एकत्रित माहिती पर्यटकांना उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या १३८ पर्यटन स्थळे आहेत. त्या सर्व ठिकाणांची माहिती, त्यांची वैशिष्ट्ये, त्या ठिकाणी असलेल्या क्रीडा सुविधांसह सर्व माहिती देणारे ॲप विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
पर्यटनस्थळांवर एकाचवेळी पर्यटकांची गर्दी होऊ नये, तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्याबाबतची माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन विकास आराखडा या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यांत ॲपच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होऊन वर्षभरात प्रत्यक्ष वुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी