कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:15 IST2024-09-20T16:14:23+5:302024-09-20T16:15:38+5:30
महामारीची साथ आल्यावर कामगार पळून जाता कामावर हजर राहिले, शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला

कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत
पुणे : पुण्यात जेव्हा महामारीची साथ सुरू झाली तेव्हा कष्टकरी कामगारांनी रजा काढल्या नाहीत किंवा पळून गेले नाहीत. ते कामावर हजर राहिले, शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला. कष्टकरी बांधव तोंडावर मास्क ठेऊन कामावर येत होते. माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
अखिल मंडई मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूकीदरम्यान आणि गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवणाऱ्या ४०० हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वंचित आणि उपेक्षितांसाठी संस्था चालविणाऱ्या संस्थाचालकांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, विक्रम खन्ना, सुरज थोरात, राजेश कारळे उपस्थित होते. उपरणे, श्रीफळ, शारदा गजाननाची प्रतिमा, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.
डॉ. आढाव म्हणाले, कष्टकरी वर्गाचा सन्मान करून विधायक काम मंडळ करीत आहे. सत्कार घ्यायला ज्या भगिनी आलेल्या आहेत, मंडईच्या पायाची जमीन सुद्धा त्यांच्या नावाची आहे. कष्टकरी कचरा उचलतात ते महानगर पालिकेचे नोकर नाहीत. काच, प्लास्टिक, लोखंड गोळा करून पुनर्निर्मिती होते आणि त्यातून त्यांच्या पोटाला आधार मिळतो.
अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात आणि विसर्जन मिरवणुकी नंतर देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण शहर स्वच्छ राहते. कोणतीही रोगराई न पसरण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण पुणेकरांच्याआरोग्याच्या दृष्टीने या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाला खूप महत्त्व आहे.