नवले पूल दुर्घटनेनंतर उद्योगमंत्र्यांची पाहणी; अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याचे सामंत यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:41 IST2025-11-20T18:41:02+5:302025-11-20T18:41:15+5:30
केवळ तात्पुरत्या नव्हे, तर दीर्घकालीन उपायांवर देखील चर्चा करण्यात आली, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना पूर्णपणे थांबतील

नवले पूल दुर्घटनेनंतर उद्योगमंत्र्यांची पाहणी; अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याचे सामंत यांचे निर्देश
धायरी: नवले पुल परिसरात अलीकडे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता. २०) घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. वारंवार होणाऱ्या अपघातांवर तात्पुरते आणि कायमस्वरूपी उपाय तातडीने अंमलात आणण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नवले पुलाचा उतार, या मार्गावरील वेगवान वाहतूक आणि रस्त्याची रचना या प्रमुख कारणांमुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री सामंत यांनी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधला आणि त्यांच्या सूचनांची नोंद घेतली. केवळ तात्पुरत्या नव्हे, तर दीर्घकालीन उपायांवर देखील चर्चा करण्यात आली, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना पूर्णपणे थांबतील.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील लवकरच नवले पुलाची पाहणी करणार असून, त्यानंतर ते उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर, नमेश बाबर, रमेश कोंडे, सोमनाथ कुटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
तातडीच्या उपाययोजनांसाठी सूचना...
अतिरिक्त मनुष्यबळ: वाहतूक प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे.
ब्रेक-टेस्टिंग झोन: धोकादायक उतारावर ब्रेक-टेस्टिंग झोन त्वरित तयार करावेत.
सूचना फलक: वाहनचालकांना सावध करण्यासाठी सूचना फलक मोठ्या प्रमाणात लावावेत.
रस्त्याची दुरुस्ती: रस्त्याच्या आवश्यक दुरुस्तीच्या कामाला त्वरित गती द्यावी.