भिगवण यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत गोंधळ; जेष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:00 IST2025-04-11T13:57:57+5:302025-04-11T14:00:56+5:30
वाद सोडविण्यास गेलेल्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली.

भिगवण यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत गोंधळ; जेष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
भिगवण - इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या नियोजनासाठी आज शुक्रवारी (दि. ११ एप्रिल) घेण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोंधळ उडाला. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जेष्ठ नागरिक बाबा धवडे यांना काही तरुणांकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ग्रामसभेत बाबा धवडे यांनी यात्रा सोहळ्यावरील खर्चाबाबत शंका उपस्थित करत, हा सोहळा धर्मादाय आयुक्तालयाच्या प्रशासकाच्या माध्यमातून पार पडावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर काही क्षणांतच वातावरण तापले आणि बंद दरवाजामागील चर्चेपूर्वीच काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. यावेळी वाद सोडविण्यास गेलेल्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली.
भिगवण यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत गोंधळ; जेष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल#pune#bhigwan#Police#seniorcitizenspic.twitter.com/g1tRYKoIzK
— Lokmat (@lokmat) April 11, 2025
या सभेस तहसीलदार जीवन बनसोडे, धर्मादाय विभागाच्या प्रज्ञा कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन महांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. गतवर्षीपासून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटीच्या माध्यमातून बँक खात्यातून खर्चाचे नियोजन केले जात आहे. यंदाही अशीच पद्धत ठेवून दोन दिवसांत वर्गणी संकलन करून नियोजन करण्याचे तहसीलदारांनी सांगितले होते. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या प्रकाराची दखल घेण्यात येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.