वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:12 IST2024-12-19T11:10:49+5:302024-12-19T11:12:52+5:30

सहा महिन्यांत वॉलेटद्वारे तब्बल १७७ कोटींचा भरणा; वॉलेटधारकांना मिळाले ८० लाखांचे कमिशन

Increasing response to 'MahaPower-Pay' for paying electricity bills | वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद

वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद

पुणे : महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला पुणे विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत १६ लाख ६ हजार ६६२ वीजग्राहकांनी १७७ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांचा वॉलेटद्वारे भरणा केला आहे. तर कमिशनपोटी वॉलेटधारकांनाही ८० लाख ३३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत ६०१ जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे.

ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. त्यात १८ वर्षांपेक्षा जास्त कोणतीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. एखाद्या ग्राहकाला वीजबिल भरायचे असल्यास या वॉलेटधारकाला देता येते.

त्यानंतर वॉलेटधारक आपल्या वॉलेटमधून वीजबिल भरतो. त्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येते. वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय , उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

काेल्हापूर जिल्ह्याने घेतली आघाडी!

‘महापॉवर-पे पेमेंट वॉलेट’मध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात सर्वाधिक ३३२ वॉलेटधारक निर्माण झाले असून, ७ लाख १५ हजार ४६५ ग्राहकांनी या वॉलेटमधून ७२ कोटी ९७ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे. त्यातून वॉलेटधारकांना ३५ लाख ७७ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ९४४ ग्राहकांनी ५८ कोटी ५९ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला असून जिल्ह्यातील ८३ वॉलेटधारकांना २९ लाख ४ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे.

पुणे विभागात जवळपास १७ काेटींचे बिल ‘महापाॅवर-पे’ला!

सांगली जिल्ह्यात १ लाख ६ हजार ६० वीजग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात ७९ वॉलेटधारकांना ५ लाख ३० हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात ९१ हजार ८३५ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १२ कोटी ७६ लाख रुपयांचे वीजबिल भरले. यात ५१ वॉलेटधारकांना ४ लाख ५९ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील १ लाख १२ हजार ३५८ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १६ कोटी ९६ रुपयांचा भरणा केला. यात संबंधित ५६ वॉलेटधारकांना ५ लाख ६१ हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले.

Web Title: Increasing response to 'MahaPower-Pay' for paying electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.