अजित घस्ते
पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतियांना बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर गॅस (दि. ५ मार्च) गुरुवारपासून कंपन्यांनी वितरणास व बुकिंगसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पुणे शहरातील हॉटेल व्यवसाय बहुतांशी व्यावसायिक गॅसवर अवलंबून आहे. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी देखील रांगा लावाव्या लागत आहेत. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून पुणे-मुंबईतील हॉटेल व्यवसायांना लवकरच टाळे लावण्याची वेळ येईल, अशी भीती हॉटेल -रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिंग असोशिएशन यांनी केली आहे. कोरोनामध्येही एवढी वाईट अवस्था नव्हती झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे.
घरगुती गॅस बुकिंगसाठी तांत्रिक अडचणीचा सामना
गेल्या पाच दिवसांपासून व्यवसायायिक गॅस सिलिंडर बुकिंग आणि वितरण बंद करण्यात आले आहे. याशिवाय आता घरगुती गॅस बुकिंगसाठीदेखील अनेक तांत्रिक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. वितरण कंपनीकडून बुकिंगसाठी फक्त रिंग होते. तर तात्रिक संदेश पाठवून बुकिंग केले जात नाही. यामुळे स्वयपाकांचा घरगुती गॅस मिळवण्यात देखील अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या समस्या नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडल्या.
घरगुती सिलिंडर बुकिंगसाठी आता ३० दिवसांचा कालावधी
पुर्वी घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तो आता ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका ग्राहकाला एकच सिलिंडर मिळणार आहे. यामुळे घरगुती सिलिंडर गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असून बुकिंग करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गॅस वितरक कंपन्यांकडून ग्राहकांची गैरसोय होत आहे. तर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असलं तरी देखील प्रत्यक्षात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना वितरण कार्यालयांमध्ये जावे लागत आहे.
लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ?
पुणे शहरातील व उपनगरातील हॉटेल-रेस्टॉरंट व छोटे व मोठे व्यावसायिक असे ८ ते १० हजार हॉटेल व्यावसायिक आहेत. यामध्ये काम करणारे लाखो कामगारांवर आर्थिक कुऱ्हाडीसह उपासमारीची वेळ येणार आहे. हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिक चालकांसह आता कामगारही संकटात सापडले आहे.
औद्योगिक गॅसचा पुरवठा तातडीने वाढवा
घरगुती व औद्योगिक क्षेत्रासाठी समतोल वितरण व्यवस्था सुनिश्चित करावी. पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पर्यायी आयात स्रोत व आपत्कालीन उपाययोजना कराव्यात आणि बाजारातील काळाबाजार व कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी कडक कारवाई करावी, असे आवाहन हॉटेल संघटनांकडून केले जात आहे. तसेच व्यावसायिक गॅसचा तातडीने पुरवठा वाढवावा, अशी सरकारकडे मागणी केली जात आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतीय हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुणे शहरातील उद्योग बंद पडू लागतील. यातून लाखो कामगारांवर संकट येणार असून, कामगार आणि हॉटेलचालक सुरक्षित राहावेत आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत.- गणेश शेट्टी, अध्यक्ष पुणे-रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिंग असोसिएशन
सध्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले असून गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक उद्योग धोक्यात आले आहेत. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर अनेक उद्योगांना उत्पादन कमी करून हॉटेल तात्पुरते बंद करावे लागेल. त्यामुळे लाखो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. - राजेश अग्रवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन.
घरगुती ग्राहकांची चिंता वाढली
घरगुती गॅसच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या असतानाच आता घरगुती सिलिंडरसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा गॅसची बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहे, तर बुकिंग केल्यानंतर सिलिंडर मिळण्यास ४ ते ७ दिवसांचा विलंब होत आहे. तसेच घरगुती गॅस बुकिंगसाठी रांगा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
लग्नकार्यावरही संकट
लग्न कार्यालयात जेवण बनवणाऱ्या केटर्सनादेखील व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने विवाह सोहळ्याचा स्वयंपाक करायचा कशावर, असा प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे लग्न कार्यालयावरही संकट आले आहे. हेमंत इंगवले म्हणाले, की मंगल कार्यालयांना भांडी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे, विविध कार्यक्रमांसाठी आमच्याकडे भांडी बुकिंगसाठी येणारे ग्राहक गॅस सिलिंडरची मागणी करत आहेत. परंतु आम्ही यापूर्वी कधी ते दिलेले नाहीत. आम्ही देऊ शकत नाही, असे ग्राहकांना सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होत आहे. यामुळे काही ग्राहकांना त्यांच्या कार्यक्रमांच्या तारखा पुढे ढकलाव्या लागण्याची वेळ आली आहे.
गेले चार दिवसांपासून घरातला गॅस संपल्यामुळे बुकिंग होत नाही. बुक झाल्यानंतर गॅस सिलिंडर अद्यापही आलेला नाही. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. - रमा चरणकर, गृहिणी सिंहगड रस्ता
हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, खानावळ, स्नॅक्स सेंटर तसेच इतर लघुउद्योजकांची गॅस तारांबळ उडाली असून, पुढील काळात व्यवसाय करायचा कसा अशी भीती निर्माण झाली असून, शेकडो कामगारांना उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा करावा अन्यथा हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. - पुरंदर पुजारी, हॉटेल व्यावसायिक
Web Summary : Hotel owners in Pune face potential closures due to a commercial gas cylinder shortage linked to international conflicts. The situation is worsened by domestic gas booking issues. Hotel associations urge government action to prevent widespread business closures and worker hardship.
Web Summary : अंतर्राष्ट्रीय संघर्षों से जुड़े वाणिज्यिक गैस सिलेंडर की कमी के कारण पुणे में होटल मालिकों को संभावित बंदी का सामना करना पड़ रहा है। घरेलू गैस बुकिंग के मुद्दों से स्थिति और खराब हो गई है। होटल संघों ने व्यापक व्यावसायिक बंदी और श्रमिक कठिनाइयों को रोकने के लिए सरकारी कार्रवाई का आग्रह किया है।