पुणे स्टेशन परिसरातील घटना! मुंबईला जाण्यासाठी बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:03 IST2021-07-14T12:03:47+5:302021-07-14T12:03:56+5:30
चोरीच्या उद्देशाने हा खुन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्टेशन परिसरातील घटना! मुंबईला जाण्यासाठी बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा खून
पुणे: मुंबईला जाण्यासाठी बसस्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संजय बाबु कदम (वय ३५, रा. घाटकोपर) असे खून झालेल्याचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने हा खुन झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संजय कदम हे शिरुर तालुक्यातील आंबेगाव येथे एका हॉटेलमध्ये काम करत होते. ते मुळचे घाटकोपर येथील परेरावाडी येथे राहणारे आहेत. घरी जाण्यासाठी सोमवारी रात्री पुण्यात आले होते. परंतु, गावी जाण्यासाठी बस नसल्याने ते रात्री साधु वासवाणी चौकातून अंलकार चित्रपटगृहाकडे जाणार्या रस्त्यावरील विजय सेल्स या दुकानासमोरील बस स्टॉपवर झोपले होते. मध्यरात्रीनंतर कोणीतरी त्यांच्या डोक्यात व डोळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांचा खून केला. ही बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले की, संजय कदम याच्या खिशामध्ये एका मोबाईल नंबर आढळून आला होता. त्यावर संपर्क केल्यानंतर त्यांची ओळख पटली. आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुणे स्टेशन भागात रात्री अपरात्री बाहेरगावाहून येणार्या प्रवाशांना लुटण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. हत्यारांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटले जाते. कदम यांचा खूनही चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचा संशय आहे.