पोलीस असल्याची बतावणी; परदेशी नागरिकाची ५ लाखांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Updated: February 12, 2024 16:28 IST2024-02-12T16:27:11+5:302024-02-12T16:28:17+5:30
नागरिकाकडून १ लाख ७७ हजार १२० रुपयांचे सौदी रियाल चलन, २ लाख ४९ हजारांचे अमेरिकन चलन आणि ५३ हजारांचे भारतीय चलन चोरून नेले

पोलीस असल्याची बतावणी; परदेशी नागरिकाची ५ लाखांची फसवणूक
पुणे: पायी फिरणाऱ्या परदेशी नागरिकाला अडवून पोलिस असल्याची बतावणी करून त्याच्याकडे तपासणी करत असल्याचे सांगत ४ लाख ७९ रुपये १२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी सालेह ओथमान एहमद (५२, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार मधून आलेल्या दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी कोंढवा येथील आशीर्वाद चौक येथे रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी सालेह एहमद हे पत्नी सोबत पायी चालत होते. यावेळी त्यांच्याजवळ एक कार येऊन उभी राहिली. या कार मधील चालकाने अरेबी भाषेत फिर्यादी यांना पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडे असणाऱ्या वस्तूंची ओळखपत्राची पडताळणी करायची असल्याचे सांगून त्याचे ओळखपत्र दाखवल्यासारखे भासवून विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी हे खिशातील कागदपत्रे, पैसे दाखवत असतांना आरोपीने कागपत्राचा आणि पैशाचा नाकाने वास घेऊन असल्याचे भासवून फिर्यादी यांना काही समजण्याच्या आत वेगाने कार घेऊन पळून गेले. यादरम्यान आरोपी चोरट्याने फिर्यादी यांच्याकडून १ लाख ७७ हजार १२० रुपयांचे सौदी रियाल चलन, २ लाख ४९ हजारांचे अमेरिकन चलन आणि ५३ हजारांचे भारतीय चलन नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील या करत आहेत.