Sasoon Hospital: ससून रुग्णालयात गंभीर रुग्णांवर तत्काळ उपचार; वरिष्ठ डॉक्टरांची रात्रपाळीही सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:58 IST2025-10-13T16:58:23+5:302025-10-13T16:58:47+5:30
ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, रुग्ण उपचारासाठी दाखल होतात

Sasoon Hospital: ससून रुग्णालयात गंभीर रुग्णांवर तत्काळ उपचार; वरिष्ठ डॉक्टरांची रात्रपाळीही सुरु
पुणे: ससून रुग्णालयात अपघात विभागात रुग्णसेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध सुधारणा राबविण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांना तत्काळ आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत तसेच नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना तातडीने अंमलात आणल्या आहेत.
ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर अपघात विभागातील सेवेचे दर्जात्मक सक्षमीकरण करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने “रुग्णसेवा हाच धर्म” या तत्त्वावर आधारित अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या अनुषंगाने गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना तत्काळ तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावे यासाठी अपघात विभागात सहयोगी प्राध्यापक डॉक्टरांची रात्रपाळीमध्ये नियमित नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे उपचार प्रक्रियेत वेग येऊन अपघाताच्या रुग्णांचे जीव वाचविण्यात अधिक सहाय्य होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अडचणींचे तत्काळ निराकरण आणि समुपदेशन सेवा
रुग्ण व नातेवाईकांच्या अडचणी त्वरित सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व निवासी डॉक्टर यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवा अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि पोलीस चौकी
रुग्णालय परिसरात सुरक्षा वाढविण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, बंडगार्डन पोलिस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तातडीचे पोलिस सहाय्य उपलब्ध होईल.
विभागनिहाय माहिती आणि कर्मचारी व्यवस्थापन
अपघात विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती व संपर्क क्रमांक दररोज नोटीस बोर्डवर प्रदर्शित केली जात आहे. स्वच्छता, स्ट्रेचर व वॉर्ड व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी स्वतंत्र जमादारांची नेमणूक करण्यात आली आहे.
नोंदणी आणि परिचारिका सेवा अधिक कार्यक्षम
रुग्णांच्या नोंदणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी अतिरिक्त नोंदणी लिपिकांची नियुक्ती केली आहे. तसेच परिचारिकांची संख्या वाढवून औषधसाठा मुबलक ठेवला आहे, ज्यामुळे उपचारात कोणताही विलंब होणार नाही.
ससून रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि गंभीर अवस्थेतील रुग्ण येथे दाखल होतात. गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेसाठी आपत्कालीन विभागात अनेक सुधारणा व उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त केले असून विविध विभागांना तशा सूचना केल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे अपघात विभागातील रुग्णसेवा अधिक जलद, सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे. - डॉ. यलप्पा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.
रुग्णसेवा हीच सर्वोच्च जबाबदारी असून, प्रत्येक रुग्णाला समतेची आणि दर्जेदार आरोग्यसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे. रुग्ण व नातेवाइकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि आरएमओ यांना संयुक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचार, तपासणी आणि विविध सरकारी योजनांबाबत मदत करण्यासाठी समाजसेवा अधीक्षकांची नेमणूक केली आहे. - डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय