मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:41 IST2025-05-14T17:41:42+5:302025-05-14T17:41:52+5:30

बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी

Illegal wildlife hunting exposed in Maval Weapons and meat seized major action by the Forest Department | मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई

मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई

पवनानगर: मावळ तालुक्यामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वनविभागाने तत्परतेने केलेल्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे मांस जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे, विश्वसनीय माहितीच्या आधारे मंगळवारी (दि. १३ मे) मावळ तालुक्यातील तिकोणा गावाच्या हद्दीतील सिंग बंगल्यावर वनविभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईत सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. तिकोणा गाव) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक पुणे तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव प्रकाश शिंदे,वनपाल सीमा पलोडकर, गणेश मेहत्रे, संदीप अरुण आणि शेलके  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळखीकरिता पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

Web Title: Illegal wildlife hunting exposed in Maval Weapons and meat seized major action by the Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.