बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:02 IST2025-06-04T16:02:02+5:302025-06-04T16:02:44+5:30

मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना सोमवारी रात्री अचानक गॅस गळती झाली आणि स्फोट झाला

Illegal gas filling backfires; explosion due to sudden gas leak, two injured, accident at shop in Dhaire | बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना

बेकायदा गॅस भरणे अंगलट आले; अचानक गॅस गळतीने स्फोट, दोघे जखमी, धायरीतील दुकानात दुर्घटना

पुणे : घरगुती गॅस सिलिंडरमधून लहान सिलेंडरमध्ये बेकायदा गॅस भरताना झालेल्या स्फोटात दोन कामगार जखमी झाल्याची घटना धायरी परिसरात घडली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

महेश वासुदेव वाडीकर (रा. बिदर, कर्नाटक), गणेश दत्तात्रय पाटील (रा. लातुर) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी शेषनाग अप्लायन्सेस या दुकानाचे मालक आशिष अशोक मोरे (रा. धायरी) आणि जखमी कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी संग्राम शिनगारे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे याच्या धायरी येथील दुकानात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये बेकायदा गॅस भरणा करण्यात येत होता. मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना सोमवारी रात्री अचानक गॅस गळती झाली आणि स्फोट झाला. यामध्ये येथील कामगार वाडीकर आणि पाटील होरपळून जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी जखमी कामगारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.

Web Title: Illegal gas filling backfires; explosion due to sudden gas leak, two injured, accident at shop in Dhaire