पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस
By राजू हिंगे | Updated: July 14, 2024 19:02 IST2024-07-14T19:01:38+5:302024-07-14T19:02:57+5:30
सात दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करून काढून टाकणार

पुजा खेडकरच्या आईने केले फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम; पुणे महापालिकेने बजावली नोटीस
पुणे: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईने बाणेर येथील रो हाऊसच्या सिमा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर तीन फुट रुंद, दोन फुट उंची आणि साठ फुट लांबीचे बांधकाम केले आहे. हे अनधिकृत बांधकाम येत्या सात दिवसांच्या आतमध्ये स्वखर्चाने काढून घेण्यात यावे, सात दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करून काढुन टाकेल अशी नोटीस घरावर चिटकवली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आयएएस पूजा खेडकर होत्या. मात्र त्यांची काही दिवसांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली.आयएएसमध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झाला आहे. चुकीची कागदपत्र सादर केल्याचा आरोप असून त्याची चौकशी चालू आहे. त्यातच आता पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व प्रकरणे उघडकीस आल्यानंतर बाणेर परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट क्रमांक ११२ मध्ये पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या रो - हाऊसमध्ये राहण्यास आहे. मात्र त्यांनी रो हाऊसच्या सिमा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर तीन फुट रुंद, दोन फुट उंची आणि साठ फुट लांबीचे बांधकाम केले आहे.हे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असून ते येत्या सात दिवसांच्या आतमध्ये स्वखर्चाने काढून घेण्यात यावे, सात दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत काढून टाकेल जाईल, अशा आशयाची नोटीस पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवर चिकटवली आहे.