पुण्यात ३ तरुणींवर बेकायदेशीर कारवाई; पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, हर्षवर्धन सपकाळांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:20 IST2025-08-05T12:20:07+5:302025-08-05T12:20:39+5:30

ज्या पोलिसांनी हा प्रताप केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? सपकाळ यांचा सवाल

Illegal action against 3 young women in Pune; Immediately file a case against the police, demands Harshvardhan Sapkal | पुण्यात ३ तरुणींवर बेकायदेशीर कारवाई; पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पुण्यात ३ तरुणींवर बेकायदेशीर कारवाई; पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पुणे: राज्यातील पोलिस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलिस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ॲॅट्रॉसिटी कलमाखाली तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

सपकाळ म्हणाले, एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठीशी घालत आहे? पुण्याचे पोलिस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलिस काम करत आहेत. तीन तरुण मुलींवर पोलिस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदविण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी.

पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरू आहे, कोयता गँगचा हैदोस सुरू आहे, त्याला आळा घालण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे, असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत. पण, कारवाई मात्र करत नाहीत. पुणे पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखविण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Illegal action against 3 young women in Pune; Immediately file a case against the police, demands Harshvardhan Sapkal