रागात बोलणाऱ्या पत्नीकडे दुर्लक्ष; झोपेचे सोंग घेणाऱ्या पतीच्या तोंडावर ओतला उकळता चहा, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:57 IST2026-01-01T15:57:10+5:302026-01-01T15:57:50+5:30
संताप अनावर झालेल्या पत्नीने थेट गॅसवर उकळत ठेवलेला चहा पतीच्या तोंडावर ओतल्याने त्याचे डोके चांगलेच भाजले आहे

रागात बोलणाऱ्या पत्नीकडे दुर्लक्ष; झोपेचे सोंग घेणाऱ्या पतीच्या तोंडावर ओतला उकळता चहा, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे: पत्नीचे बोलणे दुर्लक्षित करत झोपेचे सोंग घेतलेल्या पतीला त्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूड परिसरात घडला आहे. संताप अनावर झालेल्या पत्नीने थेट गॅसवर उकळत ठेवलेला चहा पतीच्या तोंडावर ओतल्याने त्याचे डोके चांगलेच भाजले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रवी दीपक गागडे (२७, रा. वसंतनगर, पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांची पत्नी प्रिया रवी गागडे (२२) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गागडे हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये आर्थिक कारणांवरून वाद सुरू होते. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. बुधवारी सकाळी उठल्यानंतर प्रिया या रागाच्या भरात पतीशी बोलत होत्या. मात्र रवी यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत झोपेचे सोंग घेतले. यामुळे प्रिया यांचा संताप अधिकच वाढला आणि क्षणाचाही विचार न करता त्यांनी गॅसवर उकळत ठेवलेला चहा थेट रवी यांच्या तोंडावर ओतला.
या घटनेत रवी यांच्या कपाळाला गंभीर भाजले असून त्यांनी तातडीने ससून रुग्णालयात उपचार घेतले. रुग्णालय प्रशासनाने याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती दिली. उपचारानंतर रवी यांनी पोलिस ठाण्यात जात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी मोहन दळवी करत आहेत.