एकत्र उभे राहून क्रांती केली तर ४ लाठ्या मारतील, पण हीच रंगमंचावर केलीत तर तुमचे कौतुक होईल - नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 09:57 IST2025-09-20T09:57:28+5:302025-09-20T09:57:55+5:30
तुम्ही नाटकात का काम करता, इथे येऊन चार टाळ्या घेतल्या म्हणजे सगळे संपले असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे

एकत्र उभे राहून क्रांती केली तर ४ लाठ्या मारतील, पण हीच रंगमंचावर केलीत तर तुमचे कौतुक होईल - नाना पाटेकर
पुणे: आपण नट मंडळी आहोत. आपण एकत्र उभे राहून क्रांती करू शकत नाही. चार लाठ्या मारतील. जेलमध्ये टाकतील. पण हीच क्रांती रंगमंचावर केलीत तर तुमचे कौतुक होईल, पारितोषिके मिळतील आणि तुम्हाला जे म्हणायचे आहे ते म्हणू शकाल. प्रत्येक क्रांतीची सुरुवात ही रंगमंचावरून झाली आहे हे विसरू नका. सभोवतालचे भान ठेवून अभिव्यक्त व्हायला विसरू नका. एकदाच मरायचं आहे, रोज मरायचं आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वास्तविकतेवर बोट ठेवत विद्यार्थ्यांना समाजभान दिले. नाटकात काम करणे हे केवळ करमणुकीपुरते मर्यादित ठेवू नका. सामाजिक राजकीय परिस्थिती बदलत राहिली तर हेच नाटक शस्त्र म्हणून वापरायला विसरू नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आयोजित हिरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या हडपसरच्या अण्णाभाऊ मगर महाविद्यालयाला पुरुषोत्तम करंडक प्रदान करण्यात आला. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडला तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक सर परशुरामभाऊ महाविद्यालयाला देण्यात आला.
भरत नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी तसेच अंतिम फेरीचे परीक्षक योगेश सोमण, प्रदीप वैद्य, अश्विनी गिरी, सुहास जोशी यावेळी उपस्थित होते.
तुम्ही नाटकात का काम करता. इथे येऊन चार टाळ्या घेतल्या म्हणजे सगळे संपले असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. हे अत्यंत पावन क्षेत्र आहे. आपण त्या रंगमंचाचा योग्य वापर करत असाल तर करा. पण हा मंच विटाळू नका, असे सांगून नाना पाटेकर म्हणाले, नट म्हणून असे वाटायला हवे की जोपर्यंत मी नवीन दुःखाच्या शोधत फिरत नाही तोपर्यंत मला नट म्हणून काम करण्याचा अधिकार नाही. कारण एकाच पद्धतीची दुःख आम्ही त्याच त्याच पद्धतीने दाखवत राहणार नंतर ते खूपच जुनं होत जात. त्यामुळे सतत तुम्हाला काहीतरी नवीन शोधायला लागेल जर तुम्ही ते शोधणार नसाल तर इथे यायचं नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी विद्यार्थ्याना सांगितले. प्रत्येकाचा पिंड, भवताल वेगळा आहे. दिग्दर्शक हा लेखकाच्या दृष्टिकोनातून पाहतो. लेखकाचे लेखन आणि दिग्दर्शकाचे पर्सेप्शन त्यापद्धतीने ती नाट्यकृती समोर आली पाहिजे. ती कलाकृती एकसंध वाटली पाहिजे. रोल कोणताही असो, छोटासा रोल करणाऱ्यांमध्ये पण ताकद असते. नाटकाच्या तालमी करताना वेगळे काहीतरी सुचले पाहिजे. ते शोधत राहणे महत्त्वाचे आहे नाहीतर तुम्ही जास्त वेळ टिकणार नाही, असेही पाटेकर म्हणाले.
काही गोष्टी राहून जातात...
आता पुन्हा नव्याने नाटक करावे असे मी विक्रम (गोखले) ला म्हटले. मी 'बॅरिस्टर' करतो. असे म्हटल्यावर विक्रम म्हटला, मी ते नाटक दिग्दर्शित करतो. पण, जयवंत दळवी नाहीत. त्यांची परवानगी न घेता बॅरिस्टरचे वर्णन आपण बदलू आणि बॅरिस्टर देखणा न दाखवता रांगडा दाखवू. पण काही गोष्टी राहून जातात. त्यातले हे नाटक आहे, अशी खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.