अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे - सोनाली कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:17 IST2025-11-17T13:16:44+5:302025-11-17T13:17:00+5:30
भक्तीच्या नावाखाली कुठेही गैरप्रकार होत असतील तर ते आपल्या परीने शमवता आले पाहिजे

अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे - सोनाली कुलकर्णी
पुणे : ‘लोकविद्यापीठ हे काळाबरोबर पुढे नेणारे आणि पुढे जाण्यासाठी विचार देणारे माध्यम आहे. त्यातून विवेकी व्यक्ती निर्माण होतील. अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागापुरती राहिली नसून ती शहरात देखील फोफावत आहे. भक्तीच्या नावाखाली कुठेही गैरप्रकार होत असतील तर ते आपल्या परीने शमवता आले पाहिजे. मी जेव्हा अंनिसबद्दल बोलते तेव्हा काही वेळा समोरच्या व्यक्तीचे हावभाव बदलत असल्याचे मी अनुभवले आहे. भावनांचा खेळ केल्यानंतर येणारी मज्जा अनेकांना दिलासा देणारी असते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे,’ असे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने रविवारी (दि. १६) डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ लोकार्पण सोहळा पत्रकार भवनात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. दाभोलकर लिखित १० पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश चिंचोले, सचिव दीपक गिरमे, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, राही ढाके आदी उपस्थित होते.
सुहास पळशीकर म्हणाले, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. मात्र, व्यक्तिगत अडचणींमुळे लोक अंधश्रद्धेच्या नादी लागत आहेत. हे दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने लोकविद्यापीठाच्या माध्यमातून अंगात येणे, भूत पिशाच्च असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात या लोकविद्यापीठाचे महत्त्व असणार आहे. समाजात विवेक जागृतीचे काम झाले पाहिजे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची चर्चा जास्त चिकित्सक करावी लागेल. लोकविद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व समजावून पटवून द्यावे लागणार आहे. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक एकमेकांसोबत चर्चा करतील त्याद्वारे माहिती अदानप्रदान केली जाईल. यासाठीही काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हमीद दाभोलकर म्हणाले, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा वाढत असून, नुकतीच कोथरूडमध्ये एका दाम्पपत्याला भोंदूबाबाने १४ कोटींचा गंडा घातला आहे. जे ज्ञान उपलब्ध आहे, ते अर्जित करून घेतले पाहिजे. आज अंधश्रद्धा फक्त हिंदुस्थानात नसून, संपूर्ण जगभरात पसरली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आपल्याला आणखी काम करावे लागणार आहे.
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार रुजवण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. राज्यात ठिकठिकाणी आम्हाला अनेकजण डॉक्टरांचे भाषण ऐकलेले भेटत आहेत. विवेकवादी समाजाची निर्मिती करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.