शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:22 IST2025-04-28T12:22:07+5:302025-04-28T12:22:23+5:30

राज्यात ५० टक्के लोकसंख्या पाचशे शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते

If the face of cities is changed 50 percent of the population will have a better life Chief Minister Devendra Fadnavis | शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या पाचशे शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. त्यासाठी 'पुणे अर्बन डायलॉग'सारखे मंथन आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे महापालिका, यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित 'पुणे अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापू पठारे, हेमंत रासने, माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द करून पहिल्यांदा रस्त्यांचे जाळे निर्माण करायचे आणि नगर रचना योजनांचा उपयोग करण्याचा विचार आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून भविष्यातील पुणे असलेले नवीन शहर अथवा वसाहत तयार करत असताना मोठे रस्ते आवश्यक आहेत. त्याचबरोबर नागरी वाहतूक महत्त्वाचा विषय असून, महानगर एकीकृत वाहतूक प्राधिकरण तयार करण्यात येत आहे. प्रवासाच्या शेवटापर्यंत वाहतुकीची सुविधा मिळाल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर होत नाही. मुंबईमध्ये एकाच तिकिटावर उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणल्या असून, वॉटर टॅक्सीदेखील त्यात उपलब्ध असतील. त्याची पहिल्या टप्प्यात पुढच्या ६ महिन्यात मुंबईत अंमलबजावणी होणार असून, पुढे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात होणार आहे. पुढील काळात मार्गांचे मॅपिंग करणार असून, त्यासाठी गुगलसोबत करार करत आहोत. त्यातून सिग्नलचे सिमुलेशन करून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पुण्यात पीएमपीएमएल बस व्यवस्थेला मेट्रोचे जोड देऊन वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोला फिडर सेवा करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) तयार केले आहे असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स. गो. बर्वे ट्रस्टच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आभार मानले.

Web Title: If the face of cities is changed 50 percent of the population will have a better life Chief Minister Devendra Fadnavis