PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:30 IST2025-08-10T16:30:20+5:302025-08-10T16:30:39+5:30
सद्यस्थितीत बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे

PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे फेऱ्यांवर परिणाम असून, प्रवाशांना वाटेत गैरसोयीचा फटका बसत आहे. त्यामुळे पीएमपीकडून ‘शून्य बंद (झीरो ब्रेकडाऊन)’चे लक्ष्य ठेवून बससेवेची गुणवत्ता वाढीसाठी कठोर पावले उचलली आहेत. स्वमालकीच्या बस मार्गावर बंद पडल्यास संबंधित चालक आणि आगार अभियंता यांच्या अर्ध्या दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. याबाबत पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी आदेश काढले आहेत.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून दररोज १० लाखांपेक्षा जास्त नागरिक पीएमपीतून प्रवास करतात. मात्र, बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते. रस्त्यावरच बस बंद पडल्याने प्रवाशांना अनेकदा पावसात उभे राहावे लागते, तर काही वेळा पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची कसरत करावी लागते. सद्य:स्थितीत पीएमपीच्या स्वमालकीच्या ७३७ बसची विविध आगारांत देखभाल, दुरुस्ती करण्यात येत आहे. यासह इतर बस संचलनास पाठविण्यापूर्वी आगार अभियंता यांनी तांत्रिक तपासणी व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करूनच बस रस्त्यावर सोडावी. तसेच, चालकांनी स्वतः बसची स्थिती तपासून मार्गावर कोणताही बिघाड होणार नाही, याची खात्री करावी, असे आदेशात म्हटले आहे.
खासगी बसचे काय?
पीएमपीच्या संचलनात असलेल्या एकूण बसपैकी खासगी ठेकेदारांच्या बसची संख्या जास्त आहे. दैनंदिन बंद पडणाऱ्या बसमध्ये खासगी बसचे प्रमाण जास्त आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या मार्गावर खासगी बस धावतात. प्रशासनाकडून किरकोळ दंड लावण्यात येते. परंतु याचा काही फरक खासगी बसवर होताना दिसत नाही. केवळ स्वमालकीच्या बससाठी आदेश न काढता, ठेकेदारांच्या बस बंद पडण्याच्या प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
बस मार्गावर सोडण्यापूर्वी संपूर्ण तपासणी केली जाणार आहे. विविध पंधरा मापकांची तपासणी करूनच ती मार्गावर सोडण्यात येईल. त्यानंतरही बस बंद पडली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. - पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
पीएमपी दृष्टिक्षेप
एकूण आगार : १७
एकूण बस : १९५०
मार्गावर बस (सरासरी) : १८००
एकूण प्रवासी : १० लाख