अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:52 IST2025-05-02T13:52:03+5:302025-05-02T13:52:09+5:30
अजित पवार भाजपशी नातं तोडून सत्तेतून बाहेर येतील तेव्हाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो

अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण
किरण शिंदे
पुणे : महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र येण्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. याकडे दोन्ही पक्षांकडून सकारात्मक पढताईने बघितलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्याही एकत्र येण्याच्या चर्चा वाढू लागल्या आहेत. या चर्चेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पूर्णविराम दिला आहे. अजित पवारमहायुतीतून बाहेर पडतील, तेव्हाच ते एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे.
लवांडे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार प्रसार माध्यमांच्यातून कुणीतरी जाणीवपूर्वक बातम्या पेरत असतं. वास्तविक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संदर्भात किंवा चिन्हाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे. ती न्यायप्रविष्ठ आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडीमधला एक महत्वाचा पक्ष आहे. महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष आहे. जो विरोधक पक्षाची भूमिका बजावत आहे. दुसऱ्या बाजूला अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो प्रतिगामी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल किंवा यावं अशा बातम्या कोणी पेरत असलं. त्यांना माझं नम्रपणाने सांगणं आहे की, दोन्ही पक्ष एकत्र तेव्हाच येऊ शकतील जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडतील. सत्तेतून बाहेर येत प्रतिगामी भारतीय जनता पक्षाचं नातं तोडेल तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो. परंतु तोपर्यंत या सगळ्या अफवा आहेत या एकत्र येण्याच्या कुठल्याही बातमीत तथ्य नाही.