'तुला जिवंत ठेवणार नाही', कामावरून काढल्याचा राग, कामगाराने व्यापाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:14 IST2025-03-11T16:12:47+5:302025-03-11T16:14:44+5:30

कामावर दांड्या मारत असल्याने, ग्राहकांशी उद्धपटपणे बोलत असल्याने ३ वर्षांपूर्वी कामगाराला कामावरून काढून टाकण्यात आले होते

I won't keep you alive angry at being fired worker throws stone at businessman head | 'तुला जिवंत ठेवणार नाही', कामावरून काढल्याचा राग, कामगाराने व्यापाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

'तुला जिवंत ठेवणार नाही', कामावरून काढल्याचा राग, कामगाराने व्यापाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

बारामती : बारामती शहरातील एका कापड दुकानाच्या काचा फोडुन व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सम्यक लाईफस्टाईल दुकानाचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत राजू बेलसरे (वय २७, रा. तांदूळवाडी रोड, बारामती) याच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेलसरे हा यापूर्वी छाजेड यांच्या दुकानात कामाला होता. परंतु तो कामावर वेळेत येत नसल्याने, तसेच सतत कामावर दांड्या मारत असल्याने, ग्राहकांशी उद्धपटपणे बोलत असल्याने तीन वर्षांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून त्याने यापूर्वीही दुकानात येत कामगारांना मारहाण केली होती. तसेच गाडीची काच फोडून नुकसान केले होते. त्यामुळे छाजेड परिवार व दुकानातील कामगार त्याच्या दहशतीखाली होते. या प्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर बेलसरे याने दुकानात येत त्रास न देण्याबद्दल एक लाख रुपयांची मागणी फिर्यादीकडे केली होती.

शनिवारी (दि. ८ ) रात्री पावण नऊच्या सुमारास दुकानातील कामगारांसह फिर्य़ादी दुकानात होते. यावेळी संकेत बेलसरे हा दुकानासमोर आला. त्याने हातातील दगड दुकानाच्या काचेवर मारून समोरील काचा फोडल्या. त्यावेळी फिर्यादी काऊंटरवरून उतरून समोर गेले. त्यांना पाहून संकेत याने पळत येत त्यांना खाली ढकलून पाडले. अंगावर बसून तु मला कामावरून काढतो काय, तुला आता जीवंतच ठेवत नाही असे म्हणत हातातील दगड डोक्यात मारला. त्यामुळे कपाळाखाली जबर मार लागला. इतर कामगारांनी त्याला बाजूला केले. त्यामुळे माझा जीव वाचला. यावेळी त्याने फिर्यादीला शिविगाळही केली.त्यानंतर दुकानातील कामगारांनी छाजेड यांना दवाखान्यात नेले.दरम्यान,छाजेड यांच्यावर खासगी रुग्णालयात  उपचार सुरु असूून त्यांची प्रकृती  स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

Web Title: I won't keep you alive angry at being fired worker throws stone at businessman head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.