‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:00 IST2025-07-17T16:59:30+5:302025-07-17T17:00:31+5:30
महिला आर्थिक अडचणीत असताना भोंदूने त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले

‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे : आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक झाल्याची घटना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्कपोलिसांनी सापळा रचून एका भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. खानबाबा उर्फ मदारी महंमद खान (६५, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.
महिलेकडून पैसे उकळ्यानंतर तिला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, आरोपीने ‘याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्राद्वारे तुला बकरी करेन’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोथरूड परिसरातील ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच फिर्यादी महिलेला या बाबाबद्दल माहिती मिळाली. फिर्यादी महिला विधवा असून त्यांना दोन मुले आहेत. घरची आर्थिक चणचण दूर व्हावी, असे तिला वाटत होते. ही बाब मदारी बाबासमोर महिलेने बोलून दाखवल्यानंतर त्याने आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी पूजेसाठी भोंदूने महिलेकडून दोन लाख ६० हजार रुपये घेतले. पंधरा दिवसांपूर्वी त्याने आपल्या घरी पूजा मांडून फिर्यादी महिलेस एक मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले, तसेच ते कापड १७ दिवसांनी रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी उघडण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने मडक्यावरील कापड काढले असता, त्यात काहीच आढळले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने मदारीला फोन केला, तेव्हा त्याने याबाबत कोणाला सांगितले तर तुला मंत्राद्वारे बकरी करेन अशी धमकी दिली. त्यानंतर
महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना कळवले. मदारीने फिर्यादी महिलेला मंगळवारी (दि. १५) सायंकाळी साडेसात वाजता घरी बोलवले, त्यावेळी पोलिसांनी सापळा लावून मदारीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भोंदूबाबाने फसवणूक केल्याची तक्रार आल्यानंतर लगेचच आरोपीला अटक करण्यात आली. त्याने महिलेला सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले होते. नंतर त्याने जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला फसवले. - सुनील थोपटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलिस ठाणे