'तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू', पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:21 IST2025-07-15T20:21:02+5:302025-07-15T20:21:40+5:30
शेतातील पाईपलाईन फुटून झालेल्या वादात पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांना एका टोळक्याने धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली

'तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू', पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांना धमकी
लोणी काळभोर : रस्त्याचे काम सुरु असताना शेतातील पाईपलाईन फुटून झालेल्या वादात पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांना एका टोळक्याने धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेऊर (हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ३ जुलैला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याप्रकरणी संभाजीराव रामचंद्र कुंजीर (वय-७६, रा. ६९९/२अ.मुकंदनगर पुणे, मूळ पत्ता मु.पो. वाघापुर ता. पुरंदर जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल वाघमारे (रा. थेऊर, ता. हवेली) व त्याच्या सात ते आठ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराव कुंजीर हे पुरंदर मतदार संघाचे माजी आमदार आहेत. त्यांची थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ९ हेक्टर ७० गुंठे क्षेत्र आहे. हे क्षेत्र कुंजीर यांच्या ताब्यात असून ते अनेक वर्षापासून वहिवाट करीत आहेत. कुंजीर हे ३ जुलैला शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा पीएमआरडीएच्या वतीने रस्त्याचे काम सुरु होते. दरम्यान, कुंजीर यांच्या शेतातील सिमेंट कॉंक्रीटची भिंत जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने पाडण्याचे काम सरु होते. यावेळी त्यांनी कुंजीर यांच्या शेतातील नुकसान झाले होते हे नुकसान पाहिल्यानंतर कुंजीर यांनी सदरचे काम थांबवण्यास सांगितले. तेव्हा जे.सी.बी. व पोकलेन चालक त्यांचे मशिन बंद करून तेथून निघून गेले होते. त्यानंतर लगेचच त्या ठिकाण आठ ते नऊ जण आले, त्यातील सुनिल वाघमारे याने कुंजीर यांना धक्काबक्की केली. व त्याच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी कुंजीर यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच उद्यापासून तू येथे पाय ठेवायचे नाही, तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, आम्हाला येथे मोठा सपोर्ट आहे असे कुंजीर यांना धमकावले. याप्रकरणी माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल वाघमारे व त्याच्या सात ते आठ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.