माझे कायमच शरद पवारांच्या विचारांवर प्रेम; त्यामुळे सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:37 IST2025-10-11T18:36:48+5:302025-10-11T18:37:36+5:30
राज्याचा विकास होण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन पुढे जावे लागणार

माझे कायमच शरद पवारांच्या विचारांवर प्रेम; त्यामुळे सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल - अजित पवार
पुणे : राज्याचा विकास होण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मराठी सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी विकास पासलकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आयोजित केलेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार शंकर मांडेकर, शहराध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे, शुक्राचार्य वांजळे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक माणसे जोडली. मी कायमच शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम केले. विविध संस्थांमध्ये आपल्या विचारांची माणसे कशी राहतील याचा विचार नेहमीच केला. राज्याचे प्रश्न सोडविताना पुणे जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहावा, हा सातत्याने प्रयत्न केला. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याच दृष्टीने पुणे आणि राजगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात महापुरुषांच्या स्मारकांची कामे करताना ती दर्जेदार व्हावीत, असेही अजित पवार म्हणाले.
जिल्हा बँकेने एक कोटीची मदत द्यावी
राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक संस्था आणि बँका पुढे आल्या आहेत. पुणे जिल्हा बँकेने २६ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र ही रक्कम पुणे जिल्हा बँकेच्या सामर्थ्याच्या मानाने शोभणारी नाही. त्यामुळे किमान एक कोटी रुपये द्यावेत, अशी मी मागणी नव्हे तर विनंती करणार आहे. कारण मी पदाधिकारी नाही,” असे पवार हसत म्हणाले.