अजित पवारांचं दुखणं मला माहिती आहे! देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 12:16 IST2020-11-26T12:10:01+5:302020-11-26T12:16:14+5:30
भाजपाचे १०५ आमदार असूनही विरोधात बसावे लागल्याने त्यांच्याकडून कांड्या पिकविल्या जात असल्याची टीका अजित पवारांनी केली होती..

अजित पवारांचं दुखणं मला माहिती आहे! देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी
पुणे : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडताना पाहायला मिळतंय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशाच प्रकारे भाजपाच्या नेत्यांवर टीका करताना ' त्यांना कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गाजरं दाखवावी लागतात तसेच भाजप नेत्यांकडून काड्या पेटवण्याचे काम केले जात आहे या शब्दात टीकास्त्र सोडले होते. आता त्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देतानाच कोपरखळी देखील मारली आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस बुधवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या, भाजपाचे १०५ आमदार असूनही विरोधात बसावे लागल्याने कांड्या पिकविल्या जात असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना 'अजित पवारांचे दुखणे मला माहिती आहे.' असे म्हणत कोपरखळी हाणली.तसेच त्यावर मला काही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया दिली.
प्रभाग रचना बदलून निवडणुका जिंकता येत नाही... अजित पवारांना टोला
उपमुख्यमंत्री पवार यांच्या या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आम्ही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रभाग रचना बदलली हा पवारांचा आरोप चुकीचा आहे. त्यांना प्रभाग रचना बदलायची असेल तर ती अवश्य बदलावी. प्रभाग रचना बदलल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यांनी प्रभाग रचना बदलली तरी आम्हीच महापालिकेच्या निवडणुका जिंकू असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
भाजपावर टीका करताना अजित पवार काय म्हणाले होते...
पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना बदलणार असल्याचे वक्तव्य केले होते. भारतीय जनता पक्षाने चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रभाग रचना बदलल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच भाजपाला पालिकेच्या निवडणुका जिंकता आल्याचेही पवार म्हणाले होते. महाविकास आघाडीमधील विविध पक्षांच्या गटनेत्यांनीही पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत एकसदस्यीय किंवा द्विसदस्यीय प्रभाग रचना असावी असा सूर आळवला होता.