मी माझ्या बायकोचा खून केला; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात, शिरूर तालुक्यातील भयानक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:49 IST2026-02-20T20:44:38+5:302026-02-20T20:49:44+5:30
मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे पतीने पोलिसांना सांगितल्यावर ते अक्षरशः चक्रावून गेले

मी माझ्या बायकोचा खून केला; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात, शिरूर तालुक्यातील भयानक घटना
तळेगाव ढमढेरे : येथे प्रापंचिक कारणातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची भयानक घटना घडली आहे. सविता मनोहर कांबळे वत ३८ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता.शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीरामनगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला असे खून झालेल्या महिलेचे तर मनोहर नागोराव कांबळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे हे पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना अचानक एक इसम पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे सांगितल्याने पोलीस अक्षरशः चक्रावून गेले. दरम्यान पोलिसांनी सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्या तळेगाव ढमढेरे येथील घरी घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. घराला बाहेरुन कडी असल्याने पोलिसांनी कडी उघडून आतमध्ये पाहणी केली. त्यावेळी सदर इसमाची पत्नी सविता कांबळे घरात आतमध्ये घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली असून शेजारीच लोखंडी हातोडी पडल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने सविता कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र सविता मनोहर कांबळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत राजेश मनोहर कांबळे वय १९ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीराम नगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोहर नागोराव कांबळे वय ५३ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता.शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीरामनगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.