माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:39 IST2025-11-11T10:38:45+5:302025-11-11T10:39:21+5:30
माझ्याविरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे

माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा
पुणे: “अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी किंवा अन्य भागीदार यांच्याशी कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे माझा बोपोडी येथील प्रकरणात दाखल गुन्ह्याशी काही संबंध नाही. हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार आहे,” असा दावा बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. प्रसंगी या जागेचे मूळ मालक विद्वांस उपस्थित होते.
माझा आणि अमेडिया कंपनीचा कोणताही संबंध नाही. आमच्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करतोय, त्याचा अभ्यास करून कागदपत्रे तपासून दाखल करायला हवे होते. मात्र, रात्री दीड वाजता गुन्हा दाखल केला गेला आहे. शीतल तेजवानी यांना मी कोणतीही जागा विकलेली नाही. तेजवानी यांनी माझी जागा विक्री केल्याचे सांगितले जाते. पण त्याबाबत कोणते दस्त नाही. माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला तो रद्द करण्यात यावा. याप्रकरणात तहसलीदार यांचे निलंबन झाल्याचे सांगण्यात येते तर, त्यांचे आदेश तपासून पाहावेत. माझ्याविरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे, असे गवंडे म्हणाले.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी घोटाळ्यात आरोपी म्हणून दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि हेमंत गवंडे यांचे नाव घेण्यात आले होते. त्यानंतर हेमंत यांनी सोशल मीडियावर माझा या प्रकरणाशी संबंध नसल्याची पोस्ट केली. परंतु त्यांचं या गुन्ह्यातून नाव वगळण्यात आले नाही. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. बोपोडी येथील प्रकरणात दाखल गुन्ह्याशी काही संबंध नसून हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.