शंतनू कुकडेशी माझा काही संबंध नाही; हा माझ्या राजकीय बदनामीचा कट - दीपक मानकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:38 IST2025-05-01T13:38:07+5:302025-05-01T13:38:46+5:30
विनाकारण माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे

शंतनू कुकडेशी माझा काही संबंध नाही; हा माझ्या राजकीय बदनामीचा कट - दीपक मानकर
पुणे : शिक्षणाच्या निमित्ताने अनाथ मुलींना घरी आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे (५३, रा. पद्माकर लेन) याच्यासह अन्य जाणांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस तपासात कोट्यावधी रुपयांची देवाण-घेवाण झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांची चौकशी पुणे पोलिसांनी केली आहे.
आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपावरून ही चौकशी करण्यात आली आहे. कुकडे याचा निकटवर्तीय सीए रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्राच्या खात्यात पावणेदोन कोटी रुपये आले आहेत. दरम्यान, पोलिस तपासात कुकडेच्या बँक खात्यात १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली. त्यातील ४० ते ५० कोटी रुपये विविध व्यक्तींच्या खात्यावर गेल्याचे वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कुकडे याच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास समर्थ पोलिसांकडे आहे. तर, प्रकरणाचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखेकडूनही याचा समांतर तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. मागील आठवड्यात मानकर यांची चौकशी करण्यात आली आहे. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांत आठ आरोपी अटक करण्यात आले होते, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. २ आरोपी अजूनही फरार आहेत.
आयकर, ईडीला पोलिसांचे पत्र
शंतनू कुकडे याच्या खात्यात तब्बल शंभर कोटी रुपये आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. चेन्नई येथे एक कंपनी असून, त्या कंपनीचा कुकडे हा संचालक होता. त्या कंपनीचे संचालक पद सोडल्यानंतर त्याच्या वाट्याचे शेअर्स कुकडेला मिळाले होते, ते शेअर्स विकल्यानंतर हे पैसे आपल्या खात्यात आल्याचे कुकडे सांगतो. त्याच्या खात्यातून चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हे पैसे दहा ते पंधरा व्यक्तींपेक्षा अधिक लोकांच्या खात्यात गेले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी याबाबत आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांना पत्र लिहिले आहेत. तसेच कुकडे याच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट देखील करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सामूहिक बलात्काराचे कलम वाढवले
कुकडे विरोधात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात सामूहिक बलात्काराचे कलम वाढवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही महिलांच्या बँक खात्यात देखील कुकडेमार्फत ५ ते साडेसात लाख रुपये गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांना कुकडे हा मोठे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. कुकडे लोणावळा, महाबळेश्वर, सातारा यासह शहराच्या जवळपास असलेल्या धरणांच्या परिसरातील हॉटेलमध्ये तो मुलींना घेऊन जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मी कायदेशीर कारवाई करणार
रौनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एक जमिनीचा व्यवहार आहे. तो रौनक याच्या सोबत झाला आहे. त्याची कायदेशीर इसार पावतीदेखील झाली आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. हा आमच्या राजकीय बदनामीचा कट आहे. विनाकारण माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे. - दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँ. पार्टी, पुणे शहर (अजित पवार गट)
शंतनू कुकडे प्रकरणात अनेकांच्या बँक खात्यात पैसे गेले आहेत. दीपक मानकर यांच्या बँक खात्यात देखील कुकडेकडून आलेले पैसे रौनक जैन यांच्या बँकेतून मानकर यांच्या बँकेत आले आहेत. त्यासंदर्भात दीपक मानकर यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी चार ते पाच एकर जमिनीच्या व्यवहारासाठी ही रक्कम दिल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. पुढील तपास आम्ही करत आहोत. - संदीपसिंग गिल्ल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १