'पुढील बसस्टॉप समजतच नाही', पीएमपीच्या अनेक बसमधील ‘पुढील थांबा...' उद्घोषणा बंदच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:52 IST2026-01-26T11:52:28+5:302026-01-26T11:52:28+5:30
पीएमपी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्घोषणा सेवा पुन्हा प्रभावीपणे सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

'पुढील बसस्टॉप समजतच नाही', पीएमपीच्या अनेक बसमधील ‘पुढील थांबा...' उद्घोषणा बंदच
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ‘पुढील थांबा’ उद्घोषणा यंत्रणा अनेक बसमध्ये बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बसमधून नव्याने प्रवास करणाऱ्या, बाहेरून आलेल्या नव्या प्रवाशांना पुढे कोणता थांबा आहे, याची माहिती होण्यास अडचण येत आहे. त्यामुळे बंद पडलेल्या बसमधील उद्घोषणा सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक बससेवा पुरवली जाते. दररोज सुमारे १० लाख प्रवासी पीएमपीतून प्रवास करतात. प्रवाशांना पुढील थांब्याची अचूक माहिती मिळावी, यासाठी बसमध्ये (थांबा) उद्घोषणा यंत्रणा एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती. पीएमपी कर्मचाऱ्यांच्या आवाजात सर्व थांब्यांची नावे रेकॉर्ड करून ऑडिओ फाइल्स तयार करण्यात आल्या होत्या. ही सेवा गेल्या सुमारे वर्षभरापासून कार्यान्वित होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अनेक बसमधील उद्घोषणा यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. पुढील थांबा कोणता आहे, याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांना वारंवार इतरांकडे चौकशी करावी लागत आहे.
दरम्यान, ठेकेदारांकडून चालविल्या जाणाऱ्या बसमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणात बंद असताना पीएमपी प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई किंवा पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. पीएमपी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्घोषणा सेवा पुन्हा प्रभावीपणे सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांची मागणी काय?
- ठेकेदार बसमध्ये उद्घोषणा यंत्रणा तातडीने सुरू करावी.
- बस डेपो स्तरावर नियमित तपासणी करावी.
- बंद असलेल्या यंत्रणेबाबत दंडात्मक कारवाई करावी.
- दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीस प्राधान्य द्यावे.
पीएमपीत उद्घोषणा बंद पडल्यामुळे पुढील येणारा थांबा कोणता आहे, हे समजत नाही. त्यामुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांना विचारावे लागते. वर्षभरापूर्वी नव्यानेच यंत्रणा चालू केली होती. आता अनेक वेळा उद्घोषणा होत नाही. ती सुरू करण्यात यावी. - संजीव साखरे, प्रवासी.