माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:18 IST2025-05-08T12:17:27+5:302025-05-08T12:18:48+5:30
जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं असं म्हणत अमित ठाकरेंनी मनातील खंत बोलावून दाखवली

माझ्या वडिलांनी व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेला सल्ला मी ऐकला नाही; अमित ठाकरेंची खंत
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांची प्रसिद्ध चित्रे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात लागली आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा व्यंगचित्र कलेचा वारसा पुढे राज ठाकरे यांनी चालवला. राजकीय जीवनात व्यस्त असतानाही ते नेहमी कलेला वेळ देत असतात. त्यांच्या आयुष्यातील व्यंगचित्राचे महत्व त्यांनी अनेक वेळा कार्यक्रम आणि भाषणांमध्ये बोलून दाखवले आहे. त्याबाबत आता ही व्यंगचित्र कला न शिकल्याची मनातील खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केली. पुण्यात बालगंधर्व येथे व्यंग चित्रप्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मी लहान असताना वडिलांनी मला रोज एक चित्र काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र तेव्हा मी त्यांचे ऐकले नाही. जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनातील खंत बोलून दाखवली. अमित ठाकरे म्हणाले, मला आज एवढं वाईट वाटतंय जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तो मी ऐकला असता तर माझ एक व्यंगचित्र इथं लागलं असत. जो मी एकला नाही. ही कला तुम्हाला कोणी शिकवून चालत नाही. ती खरतर तुमच्या आत असावी लागते. माझे अनेक मित्र आहेत जे चित्रकला शिकले आहेत. त्याची व्यंगचित्र शिकण्याचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत त्यांना एक साधी एक रेषा काढता येत नाही. त्यामुळे ही कला तुमच्या आत आहे. आज मला बघून एवढा आनंद झाला की, मुलांनो ही तुमच्यातली कला आहे ती घालवू नका. जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तोच मी तुम्हाला देईन. की कितीही तुम्ही व्यस्त झालात आयुष्यात तरी एक तास व्यंगचित्राला देत जा असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.