Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:09 IST2025-08-25T19:08:36+5:302025-08-25T19:09:23+5:30
Atharva Sudame : अथर्व सुदामे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
Atharva Sudame : अथर्व सुदामे (Atharva Sudame) हा सोशल मीडियावर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडीओमुळे सध्या वाद सुरू झालाय. या व्हिडीओत तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो, यावेळी त्याला मूर्तीकार मुस्लिम असल्याचे कळते. यावेळी तो मूर्तीकार तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची असेल तर घ्या असं सांगतो. सुदामे याने त्याच मूर्तीकाराकडून मूर्ती घेतल्याचे दाखवले आहे. या व्हिडीओमुळे वाद सुरू झाला आहे. नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंगनंतर सुदामे याने व्हिडीओ डिलिट केला. दरम्यान, आता अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले.
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. "अर्थव सुदामेचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये तो हिंदू-मुस्लिम ऐक्याची काहीतरी अक्कल शिकवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वत:चं पोटभर! यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस,"असा सल्लाही दवे यांनी दिला.
"दुधात टाकलेली साखर हे साखरेचं काम करतेय की विषाचं काम करतेय हे गेली 700-800 वर्ष हिंदू भोगतोय! हिंदूंनी भोगलेलं आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य, गणपती कसे बसवायचे? कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाहीये. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. हिंदूंना कळतं कोणाकडून काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कधी घ्यायचं. तू फक्त तुझा करमणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरता तुझा धंदा मर्यादित ठेव',असंही दवे म्हणाले.
असिम सरोदे मैदानात
"अथर्व सुदामेने घाबरुन व्हिडीओ डिलिट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्वबाबत अनेक लोक विविध मते मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. पण, त्याने सातत्याने रिल्स तयार केलेत. स्पर्धेच्या युगात त्याने स्वत:चा एक मार्ग तयार केलाय. त्याचे कौतुक करायला पाहिजे. काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते. कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले, अशी चिंता वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढयासाठी मी अथर्व सोबत आहे. राज ठाकरे साहेबांनी अथर्वचे जाहीर कौतुक केले होते. तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडीओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया, असंही असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.