घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:41 IST2025-01-29T16:39:59+5:302025-01-29T16:41:34+5:30

GBS Outbreak: औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले. 

How did GBS happen even though there was food and water in the house? | घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न

घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न

पुणे -  पुणे - पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसली आहे. या विषाणूचे आतापर्यंत १११ संशयित रुग्ण शहरात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ०५ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत ८६, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२ तसेच इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण असे एकू्न १११ रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. १११ रुग्णांमध्ये ७७ पुरुष रुग्ण तर ३४ महिला रुग्ण असून यापैकी १३ रुग्ण हे अतिदक्षता (व्हेंटीलेटर) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

दरम्यान, पुण्यातील धायरी परिसरातील 40 वर्षीय व्यक्तीला या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवीण कल्लप्पा विभुते (वय ४०, रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. ते पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे घरातील सर्वांचा धक्का बसला असून नेमका त्यांना हा आजार कसा झाला असा प्रश्न कुटूंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.    

एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, प्रवीण यांच्या भावाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. माध्यमांशी बोलतांना प्रशांत विभुते म्हणाले,'८ आणि ९ जानेवारी दरम्यान प्रविण यांना जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले. त्यानंतर संक्रांतीचा सण व्यवस्थित पार पडला, पण १७ जानेवारीला प्रविण यांना अन्न गिळताना त्रास होऊ लागला. त्यांच्या पायांत जडपणा जाणवू लागल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना तातडीने पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत गेली. काही दिवसांतच त्यांचे हात आणि पाय निकामी झाले. त्यानंतर त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना GBS असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांनी या दरम्यान घरीच बनवलेले अन्न खाल्ले असून घरातील स्वच्छ पाणी पिले होते. त्यांनी कधीच शिळे अन्न खाल्ले नव्हते. त्यांना हा आजार नेमका झाला कसा असा प्रश्न सध्या आमच्या मनात आहे.असेही प्रशांत विभुते यांनी सांगितले.

या रुग्णाची जीबीएस आजारावर मात

निलेश अभंग या तरुणाने जीबीएस या आजारावर ४ महिन्यांनी मात केली. त्यानंतर लोकमतने अभंग यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे.
 

Web Title: How did GBS happen even though there was food and water in the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.