महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:03 IST2025-01-31T19:03:00+5:302025-01-31T19:03:53+5:30
सुरुवातीला वाल्मीक कराड त्याला पाठीशी घातल्याचा आरोप तर त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले जात आहेत

महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल
पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण मागील दोन महिन्यांपासून तापलेलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. सुरुवातीला वाल्मीक कराड त्याला पाठीशी घातल्याचा आरोप तर त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.
या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं नामदेव शास्त्री यांनी सांगितलं. इतकच नाही तर धनंजय मुंडे हे खंडनखोर किंवा गुन्हेगारही नाहीत असेही त्यांनी म्हटले. आणि नामदेव शास्त्रींच्या या विधानानंतर पुन्हा एका नव्या वादाला तोड फुटलेय. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेवर राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. परळीत करुणा मुंडे यांच्या गाडीत धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच पिस्तूल ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटलय. त्यानंतर अनेक दिवस करुणा मुंडे या प्रकरणात तुरुंगात होत्या. त्यामुळे महंत नामदेव शास्त्री अशा मुलाची बाजू कशी काय घेऊ शकतात असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केलाय. तृप्ती देसाई यांनी यासंदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आणलाय. ज्यामध्ये महिलेच्या दशातील एक व्यक्ती गाडीत पिस्तूल ठेवत असल्याचा त्यांनी म्हटले .आणि पिस्तूल ठेवणारा हा व्यक्ती पोलीस असून त्याचे नाव सचिन सानप असल्याचं त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओत म्हटलंय.
तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्या पहा...
महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल#Pune#beed#truptidesai#DhananjayMundepic.twitter.com/Owql7QbvRH
— Lokmat (@lokmat) January 31, 2025
दरम्यान तृप्ती देसाई यांनी समोर आणलेल्या या व्हिडिओ नंतर राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत. इतकच नाही तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ही होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी देखील करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारा व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. इतकच नाही तर ती व्यक्ती अजूनही बीड पोलीस दलात आहे. त्याची चौकशी करावी आणि कामावरून काढून टाकण्यात यावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती. त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी चक्क व्हिडिओज समोर आणलाय. त्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.