पुण्यात कडाक्याच्या थंडीत बेवारस वृद्ध उघड्यावर; आहे त्या जागेचे भाडे परवडेना अन् महापालिका जागा देईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:27 IST2025-11-20T17:25:57+5:302025-11-20T17:27:12+5:30
कुठलीही शहानिशा न करता त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेला रुग्ण कसे हस्तांतरित केले? समाजसेवेच्या नावाखाली जर कोणी रुग्णांच्या जीवाशी खेळत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे.

पुण्यात कडाक्याच्या थंडीत बेवारस वृद्ध उघड्यावर; आहे त्या जागेचे भाडे परवडेना अन् महापालिका जागा देईना
पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यात थंडी वाढली आहे. तारा दहा अंशाच्या खाली आला आहे. त्यामुळे अनेक लाेक आजारी पडत आहेत. अशातच वृद्ध, बेवारस, निराधार लाेकांना उघड्यावर आणल्याचा प्रकार हडपसर भागात घडला आहे. रुग्ण आधार फाउंडेशनच्या आस्क वृद्धाश्रम-अनाथाश्रमातील लाेक महिनाभरापासून उघड्यावर आहेत. याबाबत प्रश्न उपस्थित हाेताच समाजकल्याण आयुक्त आंदाेलनस्थळी जात या वृद्धांना अनाथाश्रमात साेडून आल्या. पण, भाडे परवडत नाही म्हणून उघड्यावर आलेल्या संस्थाचालकासह या वृद्धांच्या मुळ प्रश्नाच काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
गेल्या ३२ दिवसांपासून सर्वे नंबर ४७ हिस्सा क्रमांक ३३ मुंढवा येथील पुणे महापालिकेच्या जमिनीवर हे आंदाेलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत १६ वृद्ध रस्त्यावर आले असून, हे सर्व दादासाहेब गायकवाड यांच्या आस्क ओल्ड एज संस्थेतील आहेत. सध्याच्या जागेचे भाडे २५ हजार वरून ३५ हजार रुपये केल्याने ते परवडत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही. आंदाेलन केलं तर मागणीची दखल घेण्याऐवजी प्रशासन उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करत आहे. अखेर उघड्यावर यावे लागले, अशी भावना गायकवाड व्यक्त करीत आहेत. उघड्यावर बसलेल्या वृद्धांना काही आजार आहेत. ते या कडाक्याच्या थंडीत थांबू शकतील का? असे गायकवाड यांना विचारले असता सर्व वृद्ध व्यवस्थित असल्याचे सांगितले आहे. परंतु काही वृद्ध आजारी असल्याचे दिसून येत आहे.
बेवारस ज्येष्ठ रुग्णांना उपचारासाठी ‘ससून’मध्ये दाखल केले जाते. त्यातून ते बरे झाले की त्यांना गायकवाड आस्क अनाथाश्रम या संस्थेकडे सोपवले जाते. अशा बेवारस ज्येष्ठांना मागील काही दिवसांपासून रस्त्यावर राहावं लागत आहे. यावरून ससून प्रशासन बेवारस वृद्धांना अन्य संस्थेकडे सोपवताना शहानिशा करत नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे. याबाबत विचारणा केली असता ‘ससून’ प्रशासनाने सांगितले की, दादा गायकवाड यांच्या संस्थेकडे जागा अथवा इमारत नाही, याची माहितीच नाही. याबाबत आम्ही आता तरी काही सांगू शकत नाही. यावर आता धर्मादाय ट्रस्ट ठरवेल, असे स्पष्ट केले.
फुटपाथ वरील, उकिरड्यावरील, पुलाखालील मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, वैफल्यग्रस्त आजी-आजोबांचे मी पालन पोषण करतो. याकरीमा महापालिकेकडे मालकी हक्काची जमीन मागतोय. तीही उपकाराने नाही, तर ठेव ठेवून भाडेतत्त्वावर मागतोय. आठ वर्षे झाली मी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. अखेर वृद्धांना घेऊन रस्त्यावर आलो आहे. - दादासाहेब गायकवाड, चालक, आस्क वृद्धाश्रम-अनाथाश्रम
माझे मामे सासरे प्रकाश पुरोहित यांना उपचारासाठी दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा नोंदणी क्र. 1/12/59900 असा आहे. सदर रुग्णास उपचारानंतर दि. ४ डिसेंबर २०२४ राेजी आस्क ओल्ड एज होम, सव्हें नं. १३१, शिवशंभोनगर, उरुळी देवाची, फुरसुंगी येथे संगोपनासाठी पाठविले होते. त्यावर अनाथाश्रमात चाैकशी केली असता ४ डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत ते निवासी तेथे हाेते. फेब्रुवारी २०२५ मध्ये तब्येत परत खालावल्यामुळे गायकवाड यांनी बेवारस रूग्ण म्हणून पुराेहित यांना ‘ससून’मध्ये दाखल केले. याबाबत गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत आहेत. - पुष्कर तुळजापुरकर, पदाधिकारी, भाजप
...तर जबाबदार काेण?
- आस्क वृद्धाश्रम-अनाथाश्रमात किती बेवारस लाेक दाखल झाली, किती परत गेली याची कोणतीही नोंद का नाही?
- फुरसुंगी येथील संस्थेची वास्तू अत्यंत मोडकळीस आलेली असून, तीही वास्तू बंद हाेती. मग, सर्व गेले कुठे?
- मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या समोरील मैदानात उघड्यावर सर्व वृद्ध बसले असून, त्यांना काही झाल्यास जबाबदार काेण?
रुग्ण पाठवलेच कसे?
फुरसुंगी येथील जागा ही भाड्याची असून, सदर जागेचे भाडे रुपये २५ हजार वरून ३५ हजार करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेला जागेची समस्या भेडसावत आहे. खरा प्रश्न हा आहे की, कुठलीही शहानिशा न करता त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेला रुग्ण कसे हस्तांतरित केले? समाजसेवेच्या नावाखाली जर कोणी रुग्णांच्या जीवाशी खेळत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत.