प्रशासनाला न जुमानता उभारले होर्डिंग; सांगाड्यासाठी नटबोल्टचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:12 IST2025-03-03T14:11:13+5:302025-03-03T14:12:11+5:30
राजकीय वरदहस्त असल्याने कोणाचाही धाक नसून राजकीय दबावापुढे प्रशासनाचे काहीच चालत नसल्याचे समोर आले आहे

प्रशासनाला न जुमानता उभारले होर्डिंग; सांगाड्यासाठी नटबोल्टचा आधार
हिरा सरवदे
पुणे: महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार वर्षभरापूर्वी पाडलेले होर्डिंग पुन्हा उभारण्यात आले आहे. पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला हुसकावल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही होर्डिंगचा सांगाडा उभारण्यात आल्याने संबंधिताच्या मुजोरीला कोण लगाम घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागील बाजूने नदीपात्रालगत तीन होर्डिंग एकत्र करून दीड वर्षापूर्वी एकच भले मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. होर्डिंगच्या नियमावलीला मूठमाती देऊन उभारलेल्या या होर्डिंगबाबत माध्यमांनी वृत्त छापले होते. यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या होर्डिंगवर जाहिरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते, तसेच या प्रकरणी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर, होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते. कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंग मालकाने कारवाईस स्थगिती मिळविण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते.
या घटनेस एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर, त्याच होर्डिंग मालकाकडून आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी परवानगीसंदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना पोलिसांच्या समोर दमदाटी करून हुसकावून लावण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
या संदर्भात महापालिकेच्या विधी अधिकाऱ्यांना या ठिकाणी होर्डिंग उभारण्याबाबत न्यायालयाने परवानगी दिली असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर, महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी ‘होर्डिंग’ला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. काम थांबविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.
मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने होर्डिंग उभारण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले. आता या ठिकाणी पूर्वीच्या कापलेल्या लोखंडी फाउंडेशनवरच नट-बोल्टच्या साहाय्याने सांगाडा उभारण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय लोकांना कोणाचाही धाक नसून राजकीय दबावापुढे प्रशासनाचे काहीच चालत नसल्याचे समोर आले आहे.
या निमित्ताने काही प्रश्न...
- अधिकाऱ्यांना परवानगी न दाखविता कुणाच्या आशीर्वादामुळे होर्डिंग उभारले जात आहे?
- पोलिसांकडून लहान सहान गोष्टींसाठी कागदपत्रे मागितली जातात. मग सहायक पोलिस आयुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाला लागून होर्डिंग उभारले जात असताना पोलिसांनी परवानगी का पाहिली नाही?
- होर्डिंग मालकाकडे परवानगी असेल, तर मग त्याने ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना का दाखविली नाही?
- विधि अधिकारी व महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणतात, होर्डिंगला परवानगी नाही. मग होर्डिंगच्या सांगाड्यावर परवानगी असलेल्या पिवळ्या पाट्या कशा दिसतात?