अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 16:56 IST2023-11-16T16:49:33+5:302023-11-16T16:56:11+5:30
अपघातात कुठलीही मदत न करता अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला

अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना
मंचर: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. संदीप बाळू केदारी (वय 28 रा. बोरी बुद्रुक ता. जुन्नर) व कैलास तुकाराम पारधी (वय 28 रा. वेताळे ता. खेड )अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात पारगाव ते रोडेवाडी फाटा रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बाळू केदारी व त्याचा मित्र कैलास तुकाराम पारधी हे दुचाकीवरून नारायणगाव बाजूकडून शिक्रापूर येथे जात होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजता पारगाव गावच्या हद्दीत पारगाव ते रोडेवाडी फाटा येथील हॉटेल आनंद समोर पारगाव बाजूकडून एक अज्ञात वाहन वेगाने आले. त्या वाहन चालकाने रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकीला जोरात धडक देऊन अपघात झाला. या अपघातात संदीप बाळू केदारी व त्याचा मित्र कैलास तुकाराम पारधी हे गंभीर जखमी होऊन मरण पावले आहेत. अपघातात कुठलीही मदत न करता अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला आहे. याप्रकरणी अजित बाळू केदारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालका विरोधात पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घोडके करत आहेत.