उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:26 IST2025-04-02T11:26:22+5:302025-04-02T11:26:48+5:30
एक व्यक्ती माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक देऊन चालक फरार झाला होता

उंड्रीत 'हिट ॲन्ड रन', माॅर्निंग वाॅक करणाऱ्याला कारने उडवले, सीसीटीव्ही तपासून फरार चालक ताब्यात
वानवडी: माॅर्निंग वाॅक करत असताना वाहनाने दिलेल्या धडकेत एका नागरीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उंड्री येथे घडली. धडक देऊन वाहन चालक त्याठिकाणाहून पसार झाला. सुजित कुमार बसवंत प्रसाद सिंह (वय ४९, वर्ष रा. विद्यानिकेतन सोसायटी, उंड्री) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांंनी दिलेल्या माहितीनुसार, कंट्रोलद्वारे पोलीस मार्शल यांना उंड्री येथील न्यायी इबोनी सोसायटीच्या भींतीशेजारी मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याचे समजले. पोलीसांनी घटनास्थळी आल्यावर व्यक्ती सुजित हे गंभीर जखमी होऊन पडले होते. त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव होत होता त्यामुळे त्यांना उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वाहन चालक धडक देऊन तेथून पसार झाला होता.
दरम्यान, अपघातात सहभागी असलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवळच्या निवासी सोसायट्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार वाहनाचा शोध घेत वाहनचालक समीर गणेश कड (वय ३२, रा. गंगोत्री कॉम्प्लेक्स, होलेवस्ती चौक उंड्री) यास दरडे गाव, सोरतापवाडी पुणे येथून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले.