गणिताचा इतिहास रंजक पद्धतीने उलगडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:38+5:302021-02-05T05:16:38+5:30

पुणे : आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या ‘लीलावती’ या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला ...

The history of mathematics will unfold in an interesting way | गणिताचा इतिहास रंजक पद्धतीने उलगडणार

गणिताचा इतिहास रंजक पद्धतीने उलगडणार

पुणे : आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या ‘लीलावती’ या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला जाईल. ‘अंकनाद’ या अ‍ॅपतर्फे ‘लिलावती’ या ग्रंथाबाबत वेबिनार मालिकेचे आयोजन केले आहे. १३, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही वेबिनार मालिका होणार असून, त्यात गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर हे अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. वर्षभर हा उपक्रम दुस-या शनिवारी, रविवारी चालणार आहे.

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने ‘अंकनाद’ अ‍ॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली. गणित मनोरंजक करून कसे शिकवावे, याचा ‘लीलावती’ हा आदर्श नमुना आहे. सुमारे ६०० वर्षे भास्कराचार्यांचे लीलावती आणि बीजगणित हे ग्रंथ संपूर्ण भारतभर गणित शिकवण्यासाठीची पाठयपुस्तके झाली होती. या ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्ये लिहिली, अनेक परदेशी भाषांत त्याची भाषांतरे झाली. सन १६१२ साली लीलावतीचे पर्शियन भाषेत भाषांतर झाले. हेन्री थॉमस कोलब्रुक या ब्रिटिश विद्वानाने सन १८१७ साली लीलावतीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. लीलावतीमधील गणिते मनोरंजक करण्यासाठी भास्कराचार्यांनी अनेक पशु-पक्ष्यांचा उपयोग करून घेतला आहे. सर्प, मोर, वानर, भुंगे, पावसाळी मेघ, मानस सरोवर अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. गणिताशी संबंधित अशा सर्व क्लृप्ती वेबिनारच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहेत.

Web Title: The history of mathematics will unfold in an interesting way