हिंजवडी भीषण अपघात; २ बहिणींसह भावाचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:44 IST2025-12-02T10:43:10+5:302025-12-02T10:44:02+5:30
अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसचालकाला चोप दिला, तसेच बसची तोडफोड केली.

हिंजवडी भीषण अपघात; २ बहिणींसह भावाचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील खासगी कंपनीच्या कर्मचारी वाहतूक करणाऱ्या भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर पदपथावर गेलेल्या बसने पादचाऱ्यांना धडक दिली. यात दोन बहिणींचा आणि त्यांच्या लहान भावाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड येथील महामार्गावरील पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पंचरत्न चौकात सोमवारी (दि. १ डिसेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
प्रिया देवेंद्र प्रसाद (वय १६), आर्ची देवेंद्र प्रसाद (वय ९) या दोन बहिणींसह त्यांचा लहान भाऊ सुरज देवेंद्र प्रसाद (वय ६) याचाही अपघातातमृत्यू झाला. अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर विमल राजू ओझरकर (वय ४०) या किरकोळ जखमी झालेल्या आहेत. नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) असे ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे.
अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसचालकाला चोप दिला, तसेच बसची तोडफोड केली. अपघात प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, बसचालक मद्यधुंद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच बसच्या मालकाचीही माहिती घेण्यात येत आहे.
पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमधील एका खासगी कंपनीची कर्मचारी वाहतूक करणारी बस भरधाव जात होती. त्यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. बसने रस्त्यावरील एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. त्यानंतर बस पदपथावर गेली. पदपथावरील पादचाऱ्यांना बसने जोरदार धडक दिली. यात प्रिया प्रसाद आणि आर्ची प्रसाद या दोघी बहिणींसह त्यांचा भाऊ सुरज प्रसाद या तिघांना बसने अक्षरश: चिरडले. यात आर्ची आणि सुरज या चिमुकल्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रिया प्रसाद गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिया प्रसाद हिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
प्रसाद कुटुंबावर दुःखाचा डोंगर...
मूळचे उत्तरप्रदेश येथील असलेले देवेंद्र प्रसाद हे अनेक वर्षांपासून हिंजवडी येथे लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी आशा देवी गृहिणी आहेत. प्रसाद दाम्पत्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. मात्र, बस अपघातात त्यांनी पोटचा मुलगा आणि दोन मुली गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.