आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने मंजूर केला तात्पुरता जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:17 IST2025-01-17T10:16:29+5:302025-01-17T10:17:05+5:30
विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने लग्नासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला

आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने मंजूर केला तात्पुरता जामीन
पुणे : विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयानेलग्नासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला.
आरोपीचे लग्न हे गुन्हा दाखल होण्यापूर्वी ठरले होते की, गुन्हा दाखल झाल्यानंतर? असा प्रश्न विचारला. गुन्हा दाखल होण्यापूर्वी लग्न ठरले असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने आरोपीला लग्नासाठी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करून २८ जानेवारीला हजर होण्याचा आदेश दिला. जामीन अर्जावर पुढील सुनावणी ३१ जानेवारीला होणार आहे. तिवारी याने जामीन मिळण्यासाठी ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बँक खाते उघडणे अर्जदार आरोपीच्या कामाचाच भाग आहे. १६ जानेवारी २०२५ ला त्याचे लग्न असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
शिवम राजेश तिवारी (वय २८) असे जामीन देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तिवारीसह मनोज कुमार रूपकुमार जैन (वय ३८) आणि मोहित सिंह राजेंद्र सिंह (वय २९, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर येथील सायबर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. मार्च २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात तिवारी याला दोन डिसेंबर २०२४ ला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली होती.