पुणे : पुण्यात आज सकाळापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नोकरदार वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शहरातील मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, तुळशीबाग परिसर, शिवाजी रोड येथे वाहतूककोंडी झाली आहे. तसेच सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता यांसह स्वारगेट, डेक्कन, जिल्हा परिषद चौक, टिळक रस्ता, नगर रस्ता या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले आहे
वाहतूककोंडीमुळे नागरिकांना किरकोळ अंतर पार करण्यासाठीही तासाभरापेक्षा जास्त वेळ लागत होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील या कोंडीत अडकली होती. पीएमपी बसला नियोजित वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांसह वॉर्डन काही ठिकाणी हजर होते, तर काही चौकांमध्ये कुणीच नसल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडली होती.
सकाळपासून वाढला जोर
पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला आहे. त्यामुळे त्यामुळे सखल भागांत रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. काही प्रमुख मार्गांवर खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शिवाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.
वाहनचालकांना शिस्त लागणार कधी?
पाऊस असो की, नसो शहरात कायमच वाहतूक कोंडी होते. याला वाहनचालकांची बेशिस्त हे प्रमुख कारण आहे. रस्त्यामध्ये थोडी जरी वाहने अडकली तर दुचाकीचालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने घुसवतात. त्यामुळे मागून येणाऱ्यांना, तसेच पुढे जाणाऱ्यांची अडचण होते. काही बेशिस्त चालकांमुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १७९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ ४४.९ मिलिमीटरच पाऊस पडला आहे.